भगूर नगरपरिषदेतर्फेस्वच्छता मोहीम सुरू

महाराष्ट्र टाइम्स

Bhagur Nagar Parishad launched an eight-day cleanliness drive. In Cidco, an open electrical DP poses a safety risk to residents. Drivers in Satpur are experiencing significant traffic jams due to ongoing development work and road digging. These issues are currently affecting the local populace.

भगूर नगरपरिषदेतर्फेस्वच्छता मोहीम सुरू

नाशिकरोड : भगूरमध्ये आठ दिवसांच्या स्वच्छता मोहिमेला स्वच्छता रॅलीने सुरुवात झाली. एक मार्चपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी नगरपरिषद कार्यालयात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बलकवडे यांनी स्वच्छता मोहिमेमला सुरुवात केली.

उघड्या डीपीचा धोका

सिडको : येथील प्रभाग क्रमांक २७मध्ये स्वामी समर्थ उद्यान, भाद्रपद सेक्टर येथे नागरिकांच्या घरांसमोर विद्युत डीपी उघड्या अवस्थेत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे सुरक्षिततेच्या उपाययोजना नाहीत. मोकाट जनावरे व लहान मुले याच ठिकाणाहून ये-जा करत असल्याने अचानक धक्का लागून मोठी दुर्घटना घडू शकते. विशेष म्हणजे या ठिकाणी डीपीच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात गाजरगवत उगवलेली आहे. डीपीच्या अवतीभवती सुरक्षा जाळी बसवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

खोदकामाने चालक हैराण

सातपूर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी विकासकामे होत आहेत. यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खोदकामे सुरू असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशोकनगरच्या मुख्य रस्त्यावर तब्बल दहा ते पंधरा ठिकाणी खोदकामे सुरू असून, त्र्यंबकेश्वररोड, समृद्धनगर ते अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, बारदान फाटा, गंगापूररोडकडे जाणाऱ्या वाहनचालकांना सोमवारी (दि.२३) दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.