पंतप्रधान कार्नीभारत दौऱ्यावर

महाराष्ट्र टाइम्स

Canadian Prime Minister Mark Carney arrives in India on February 26. His visit aims to deepen ties and forge new partnerships in defense, energy, and artificial intelligence. Carney will first visit Mumbai before meeting Prime Minister Narendra Modi in New Delhi. Discussions will focus on enhancing trade, technology, and cultural exchanges between the two nations.

canada prime minister mark carney on india visit new partnerships in defence energy and ai

ओटावा : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी २६ फेब्रुवारीला भारतात येणार आहेत. भारताशी संबंध व्यापक करण्याच्या आणि संरक्षण, ऊर्जा व एआय क्षेत्रात नवीन भागीदारी निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांचा हा दौरा असणार आहे. कार्नी प्रथम मुंबईला भेट देतील. त्यानंतर नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील, असे कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ‘दोन्ही नेते कॅनडा-भारत संबंध उंचावण्यावर आणि विस्तृत करण्यावर लक्ष केंद्रित करतील, ज्यामध्ये व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), प्रतिभा आणि संस्कृती; तसेच संरक्षण क्षेत्रात महत्त्वाकांक्षी नवीन भागीदारीचा समावेश असेल,’ असे त्यात म्हटले आहे.

अधिकाऱ्यास अटक

अमरावती : आंध्र प्रदेश पोलिसांनी सोमवारी बिहारमध्ये आयपीएस अधिकारी सुनील नायक यांना अटक केली. राज्य विधानसभा उपसभापती के. रघुरामा कृष्ण राजू यांच्यावर मागील प्रशासनाच्या काळात कोठडीत अत्याचार केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. अटकेची नोंद करण्यात आली असून, नायक यांना आंध्र प्रदेशात आणले जात आहे, असे गुंटूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक वकुल जिंदल यांनी सांगितले. २०२१मध्ये कोविडच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राजू यांना अटक करण्यात आली होती.

पर्यटकांची सुटका

कोलकाता : सिक्कीमच्या पूर्व जिल्ह्यातील उंच भागात मुसळधार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या ४६ पर्यटकांना लष्कराच्या जवानांनी वाचवले. रविवारी पूर्व सिक्कीम जिल्ह्यात अचानक तीव्र बर्फवृष्टी झाली. यामुळे अनेक पर्यटक आणि स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक पर्यटकांची वाहने धोकादायक रस्त्यांवर अडकली होती. परिस्थितीची माहिती मिळताच भारतीय लष्कराचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले.

पाकिस्तानी फुगे जप्त

जम्मू : जम्मूजवळील अखनूर सेक्टरमधील एका सीमावर्ती गावातून सोमवारी पाकिस्तानी पाच हजारांच्या चलनी नोटा आणि अमेरिकन डॉलर जोडलेले दोन फुगे जप्त करण्यात आले. खौर सीमा पट्ट्यातील गुनारा गावात एका झाडावर विमानाच्या आकाराचे पांढरे आणि लाल फुगे अडकलेले आढळले. पाकिस्तानी मोबाइल नंबर आणि क्यूआर कोड असलेले हे फुगे पाकिस्तानकडून या बाजूला आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून फुगे येणे ही नेहमीची बाब असली, तरी चलनी परकीय नोटा जोडलेल्या अवस्थेत फुगे आढळण्याची ही पहिलीच घटना असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.