कला-संस्कृतीचा मेळा आजपासून रंगणार

महाराष्ट्र टाइम्स

A vibrant festival of art and culture commences today, Tuesday. This event honors Chhatrapati Shivaji Maharaj and his enduring legacy. The 'Mymarathi-Kalasangam' celebration will showcase diverse arts, culture, language, and literature. It marks the UNESCO World Heritage status for several Shivaji-era forts. Dignitaries will inaugurate the festival. Entry is free and open to all.

कला-संस्कृतीचा मेळा आजपासून रंगणार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वामुळे सह्याद्रीमध्ये घुमलेले विजयाचे गाणे, ३५० वर्षांहून अधिक काळ मराठ्यांच्या रक्तात भिनलेला या राजाच्या जन्माचा आणि कर्तृत्वाचा अभिमान अशा भावनांचा उंचावत जाणारा आलेख आज, मंगळवारपासून ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या प्रांगणात, ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या इमारतीत रेखाटला जाणार आहे. यासोबत विविध कलांचा साज आणि संस्कृतीचा मेळ या महोत्सवात साधला जाणार आहे. आज, मंगळवारी दुपारी ३ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

तीन वर्षांपासून शिवजयंती आणि मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने मायमराठी-कलासंगम सोहळ्याचे ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या वारसा वास्तूच्या साक्षीने आयोजन होत आहे. या निमित्ताने कला, संस्कृती, भाषा, साहित्य यांचा संगम पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडूतील एक अशा १२ शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन मिळाल्याने मायमराठी-कलासंगम सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीला, शौर्याला, अभियांत्रिकी ताकदीला सलाम करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्यासोबतच सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार, मराठी भाषामंत्री उदय सामंत करणार आहेत. या सोहळ्यासाठी पद्मश्री विजेते लोककलाकार भिकल्या धिंडा खास पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पद्मश्री रघुवीर खेडकर २५ फेब्रुवारी रोजी उपस्थित राहणार असून मायमराठी-कलासंगमच्या मंचावरून ते तमाशा या कलेच्या जोपासनेबद्दल संवाद साधतील.

सोहळ्यासाठी राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व संचालनालय, मराठी भाषा विभाग, मुंबई महापालिका, भारतीय नौदल, मुंबई पोलिस, वाहतूक पोलिस, मुंबई विद्यापीठ, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, जे. जे. कला महाविद्यालय, वसंतदादा पाटील कला महाविद्यालय, तसेच मुंबईतील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचे सहाय्य लाभले आहे. हा कार्यक्रम नि:शुल्क असून सर्वांसाठी खुला आहे.

नृत्य, संगीत, कलेचा जागर...२