दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून १ जानेवाीर ते ३१ जानेवारी दरम्यान रेल्वे प्रवाशांच्या तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. एका महिन्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत २१ हजार ७२४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
या मोहिमेबाबत रेल्वे विभागाच्या वाणिज्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते ३१ जानेवारी या काळात महिनाभर रेल्वे तिकीट तपासणी करण्यता आली. यात एकूण २१९ तिकीट तपासणी कर्मचारी कार्यरत होते. त्यामध्ये ३४ स्क्वॉड कर्मचारी, १६७ ऑन-बोर्ड (अमेनिटी) कर्मचारी आणि १८ स्टेशनरी कर्मचारी यांचा समावेश होता.
मोहिमेअंतर्गत १२ फोर्ट्रेस तपासण्या, दोन मॅसीव्ह तपासणी आणि एक स्पॉट तपासणी अशी कारवाई करण्यात आली. याशिवाय १५ वेळेत अचानक - रात्रकालीन तपासण्या घेण्यात आल्या. प्रभावी अंमलबजावणीसाठी निवडक तपासण्यांमध्ये आरपीएफ कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात आले. रेल्वेच्या अधिकारी सूत्रांनी या मोहिमेबाबत माहिती दिली.
विशेष तिकीट तपासणी मोहिमेत चार जानेवारी २०२६ रोजी रेल्वे विभागाने एका दिवसात सर्वाधिक कारवाई केली. यात ९०९ प्रकरणे नोंदवून पाच लाख ४८ हजार ७३८ रक्कमेची वसुली करण्यात आली आहे. ही तपासणी मोहिम आदिलाबाद–नांदेड, परभणी–परळी, छत्रपती संभाजीनगर–मनमाड तसेच विभागातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर राबविण्यात आली.








