सध्याची राजकीय संस्कृती विचारशून्य

महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra's political and social culture is currently thoughtless. Thinkers and writers struggle to present new ideas. Speaking truth is rare. Dr. Deepak Pawar highlighted this during the Phule-Shahu-Ambedkar lecture series. He noted moral and intellectual decline in contemporary Maharashtra. The Marathi language, a key aspect of Maharashtra Dharma, has not been critically examined by Marathi speakers.

सध्याची राजकीय संस्कृती विचारशून्य
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक संस्कृती विचारशून्य झाली आहे. आजच्या विचारवंतांना, लेखकांना नव्याने विचार मांडता येत नाहीत. चौकटी मोडून सत्य बोलणारे लोक राहिले नाहीत,’ अशी खंत वक्ते डॉ. दीपक पवार यांनी सोमवारी व्यक्त केली.

देवगिरी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे उद्घाटन सोमवारी डॉ. पवार यांच्या हस्ते झाले. त्यांनी ‘ महाराष्ट्र धर्म : वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. रवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. दीपक पवार म्हणाले, ‘सातवाहन काळापासून बदलता महाराष्ट्र कसा आहे याचा विचार करणे आवश्यक आहे.

समकालीन महाराष्ट्रात आपल्याला वैचारिक, नैतिक अध:पतन, कृतिशून्यता दिसून येते. त्यामुळे आपल्याला विचार करणे ही गोष्ट महत्त्वाची वाटत नाही. महाराष्ट्र धर्मामध्ये मराठी भाषा हा एक महत्वाचा पैलू आहे. परंतु मराठी माणसाने मराठी भाषेची चिकित्सा केली नाही. भाषेच्या, राज्याच्या प्रश्नांबाबत आपल्याला सत्ताधाऱ्यांना विचारता आले पाहिजे. दुर्दैवाने असे करताना कोणी दिसत नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आपण विसरून गेलो आहोत, की काय अशी शंका येते. किंबहुना राज्यातील बहुसंख्या लोकांना सीमाप्रश्न माहीत नाही आणि आपल्या राजकीय व्यवस्थेला तो महत्त्वाचा वाटत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

त्रिंबकराव पाथ्रीकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले, की मराठी भाषेतून जी संकल्पना समजते ती अन्य कोणत्याच भाषेतून समजत नाही. व्याख्यानमालेत मंगळवारी ‘अजितदादा पवार : कार्य व कर्तृत्व’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक हेमंत देसाई दुसरे पुष्प गुंफणार आहेत.