सलग २४० दिवस कामासंदर्भात उच्च न्यायालयाचे आदेश व शासन निर्णयाप्रमाणे ज्येष्ठता यादीत समावेशास आणि सेवा कायम करण्यास टाळाटाळ, दिरंगाईच्या निषेधार्थ फळ रोपवाटिका, बीज गुणन केंद्र नरसिंगपूर कन्नड येथील महिला कर्मचाऱ्यांनी कन्नड तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून (२३ फेब्रुवारी) उपोषण सुरू केले आहे.
या प्रकरणी कृषी अधिकारी फळ रोपवाटिका, बीज गुणन केंद्र नरसिंगपूर यांना १७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की उच्च न्यायालयाचे आदेश व त्या आधारे पारित शासन निर्णयाप्रमाणे सलग २४० दिवस काम करूनही सेवेत कायम करण्यास, सेवा ज्येष्ठता यादीत समावेश करून लाभ देण्यास उपविभागीय कृषी अधिकारी सिल्लोड व कृषी अधिकारी फळरोपवाटिका नरसिंगपूर, कन्नड यांच्याकडून दिरंगाई होत असून, शासन निर्णयाप्रमाणे वरिष्ठ अधिकारी व कार्यालयाचे आदेश व सूचना यांचे अनुपालन करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आमरण उपोषण सुरू करीत आहोत. या निवेदनावर गेंदाबाई गंगवाल, विमलबाई शेवाळे, सखुबाई शेवाळे, कडूबाई नरवडे, पार्वतीबाई कचरू आणि छैलाबाई जाधव यांच्या सह्या आहेत.








