पेठ रस्त्यावरील तवली फाटा येथे रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत ऊसाच्या रसाचा गाडा चालविणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याप्रकरणी कार चालकासह मित्राविरुद्ध म्हसरूळ पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही संशयितांनी मद्यधुंद अवस्थेत असताना भरधाव वेगाने कार चालविल्याने विद्यार्थ्याचा बळी गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, मयूर सुरेश भोये (वय १५, रा. लक्ष्मण नगर, तवली फाटा, पेठरोड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील सुरेश यांच्या फिर्यादीवरुन संशयित चालक अमोल रमेश ढगे (रा. राशेगाव, दिंडोरी) व गणेश उत्तम पेलमहाले (मूळ रा. चाचडगाव, दिंडोरी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गणेश व अमोलने मद्यपान केले. त्यानंतर अमोल हा कार चालवित होता. अपघातानंतर चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र स्थानिकांनी त्यांना अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले. दोघांच्याही वैद्यकीय चाचणीत त्यांनी मद्यपान केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, मयूर भोये हा इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता. रविवारी (दि. २२) सायंकाळी सुमारे सव्वाचार वाजता तो वडील सुरेश भोये यांना उसाच्या रसाच्या हातगाडीवर मदत करत होता. तेव्हा एमएच १५ केके ६४६४ क्रमांकाची स्कॉर्पिओ भरधाव वेगाने आली आणि मयूरला जोरदार धडक दिली. धडकेत तो गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. जखमी मयूरला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. पुढील तपास उपनिरीक्षक गजानन जोशी करीत आहेत.






