दौंड : तालुक्यातील पारगाव येथे उसाच्या शेतातील पाचट पेटवताना एका शेतकऱ्याचा धूर व आगीच्या धगीने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. जालिंदर भालचंद्र भाडळे (वय ६९) असे मृताचे नाव आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली.
ऊसतोडणी पूर्ण झाल्यानंतर उरलेले पाचट जाळण्यासाठी भाडळे यांनी आग लावली होती. अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने ती भडकली आणि संपूर्ण शेतात पसरली. ज्वाळांनी शेतकऱ्याला चारही बाजूंनी घेरले. श्वास कोंडल्याने आणि दिशा न दिसल्याने ते शेतातील बांधावरच चक्कर येऊन पडले. घरच्यांना भाडळे बराच वेळ दिसले नाहीत. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. शेतात भाजलेल्या अवस्थेत ते सापडले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.






