‘गलगोटियाज’ घडते, कारण...

Contributed byमहेंद्र पांगारकर|महाराष्ट्र टाइम्स

Hate and prejudice stifle creativity and research, impacting India's youth and future innovations. This mindset limits intellectual growth, as the brain's thinking part becomes less active. Children learn negativity from elders, forming biased views. Open minds and tolerance are crucial for new ideas and scientific progress. Collaboration, not competition, drives modern research.

‘गलगोटियाज’ घडते, कारण...

लीकडे गलगोटियाज विद्यापीठासंदर्भात सुरू झालेला वाद देशभर चर्चेत आला, पण वस्तुस्थिती अशी आहे की ही समस्या एखाद्या एका संस्थेपुरती मर्यादित नाही. आपल्या समाजात सर्वसाधारणपणे कल्पकता, संशोधन आणि स्वतंत्र विचारांपेक्षा धार्मिक, जातीय किंवा भावनिक मुद्द्यांना अधिक प्राधान्य दिले जाते. या वातावरणाचा सर्वात मोठा फटका बसतो तो आपल्या तरुण पिढीला आणि परिणामी देशाच्या भविष्यातील नवकल्पनांना.

द्वेष आणि मेंदूची कार्यक्षमता

कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा जातीबद्दल द्वेष बाळगणे म्हणजे आपल्या विचार विश्वावर आपणच मर्यादा घालणे होय. द्वेष माणसाला एका चौकटीत अडकवतो. तो ‘मी बरोबर आणि तो चूक’ या दोनच रंगांत जग पाहू लागतो. पण कल्पकता ही नेहमी करड्या छटांमध्ये, प्रश्नांमध्ये आणि शक्यतांमध्ये फुलते. जिथे प्रश्न विचारण्याची, वेगळं पाहण्याची मोकळीकच नाही, तिथे संशोधन कसं उभं राहणार? मानसशास्त्र सांगते की जेव्हा माणूस राग, भीती किंवा द्वेष या भावनांमध्ये अडकतो, तेव्हा मेंदूचा विचार करणारा भाग कमी सक्रिय होतो आणि भावनिक भाग अधिक सक्रिय होतो. अशा अवस्थेत तर्कशक्ती, सर्जनशीलता आणि नवीन कल्पना सुचण्याची क्षमता कमी होते. म्हणजेच द्वेष ही भावना केवळ सामाजिकदृष्ट्या नाही तर बौद्धिकदृष्ट्याही घातक आहे.

बीज कुठे पेरले जाते?

ओशो म्हणतात, ‘जेव्हा तुम्ही कुणाबद्दल द्वेष करता, त्या द्वेषाची बीजे प्रथम तुमच्याच डोक्यात पडलेली असतात.’ मुलं मोठ्यांचे बोलणे ऐकूनच शिकतात. घरात जर सतत एखाद्या धर्माबद्दल, जातीबद्दल नकारात्मक चर्चा होत असेल, तर मुलांच्या मनात नकळत पूर्वग्रह तयार होतात. हे पूर्वग्रह म्हणजे विचारांवर बसलेले अदृश्य चष्मे. त्यातून मुलं जग पाहू लागतात. पण ते जग पूर्ण नसतं, ते मर्यादित आणि रंगवलेलं असतं. ज्या भूमीवर द्वेषाची बीजे पेरली जातात, तिथे मन संकुचित होतं. द्वेष माणसाला ‘स्वतःचे’ आणि ‘परके’ अशा गटांत विभागायला शिकवतो, पण कल्पकता ही विभागणी मानत नाही. ती प्रत्येक गोष्टीकडे उघड्या मनाने पाहते.

जर मन आधीच ठरवून बसलं असेल की ‘ही गोष्ट चुकीचीच आहे’ किंवा ‘ही माणसं वाईटच आहेत’, तर त्या संदर्भात नवीन विचार जन्मालाच येत नाहीत. कल्पकता विकसित होण्यासाठी आवश्यक असतं उत्सुक मन- जे प्रश्न विचारतं, शोध घेतं, वेगळेपणातही सौंदर्य पाहतं. पण द्वेष मनात भीती आणि राग निर्माण करतो. भीतीमुळे माणूस नवीन गोष्टींपासून दूर राहतो. रागामुळे तो समोरच्याचं म्हणणं ऐकायलाही तयार नसतो. अशा अवस्थेत संवाद थांबतो, आणि संवाद थांबला की नवकल्पनांचं दार बंद होतं. याउलट, आनंदी आणि सकारात्मक मन प्रत्येक गोष्टीत काहीतरी शिकण्याची संधी शोधतं. ते वेगवेगळ्या मतांमध्येही अर्थ शोधतं. अशा मनातूनच नवे शोध, नवे प्रयोग आणि नवे विचार जन्म घेतात.

विविधतेतूनच जन्मते नवकल्पना

इतिहास पाहिला तर महान शोध आणि नवकल्पना या विविध संस्कृती, विचारधारा आणि पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या सहकार्याने घडलेल्या दिसतात. विज्ञानाला धर्म, जात, भाषा यांची सीमा नसते. आपण तरुणांना ‘तो वेगळा आहे म्हणून चुकीचा आहे,’ असे शिकवले, तर ते कधीच वेगळ्या विचारांशी संवाद साधणार नाहीत. आणि संवादाशिवाय कल्पकता, नवकल्पना अशक्य आहे.

स्पर्धा नव्हे, सहकार्य आवश्यक

आज जगात संशोधन हे समूहकार्याने होते. शाळा असो, महाविद्यालय असो वा जागतिक प्रयोगशाळा, विविध प्रकल्प हे समूहाने, विचारांची देवाण घेवाण करून पूर्णत्वास नेले जातात, पण जर आपली मानसिकता द्वेष, भेदभाव आणि वर्चस्व याभोवती फिरत असेल, तर आपण सहकार्य कसे शिकणार? सहकार्याशिवाय आधुनिक संशोधन अशक्य आहे.

तरुणाईला चुकीच्या दिशेने वळवणे

जेव्हा तरुणाईला धार्मिक किंवा जातीय रंगात अडकवले जाते, तेव्हा त्यांची ऊर्जा विधायक कामाऐवजी संघर्षात खर्च होते. ज्या वयात नवीन प्रयोग, स्टार्टअप्स, संशोधन, पेटंट्स यांचा विचार व्हायला हवा, त्या वयात जर चर्चा द्वेषाच्या भोवती फिरत असेल, तर देशाची बौद्धिक प्रगती थांबते.

प्रश्न विचारण्याची भीती

द्वेषप्रधान वातावरणात प्रश्न विचारणाऱ्याला विरोधक समजले जाते. पण विज्ञानाची सुरुवातच प्रश्नांपासून होते. ‘का?’ आणि ‘कसे?’ हे प्रश्न विचारू दिले नाहीत, तर संशोधन कसे घडणार? त्यामुळे मुक्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे अत्यावश्यक आहे.कल्पकता ही खुल्या मनात फुलते. जिथे प्रेम, सद्भावना आणि परस्पर आदर असतो, तिथे माणूस निर्भयपणे विचार मांडतो. चुका करण्याची भीती नसते. आणि चुका न करता कोणीही शोध लावलेला नाही. म्हणून जर आपण खरोखर संशोधनवृत्ती वाढवायची असेल, तर प्रथम द्वेषमुक्त वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.

समाज माध्यमांचा विळखा

जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट विचारधारेच्या किंवा द्वेषाच्या प्रभावाखाली असतो, तेव्हा आपण नकळतपणे ‘कन्फर्मेशन बायस’ चे बळी ठरतो. म्हणजे, आपल्याला फक्त तेच सत्य वाटते जे आपल्या पूर्वग्रहांना पुष्टी देते. त्यात भरीस भर म्हणजे समाज माध्यमे! समाज माध्यमांच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर समविचारी लोकांचे गट तयार होऊन केवळ त्याच प्रकारची विचारधारा असलेल्या माहितीचे आदान प्रदान केले जाते, त्याच गोष्टींचे उदात्तीकरण केले जाते. यामध्ये एआयच्या मदतीने हवे तसे चित्रं, व्हिडिओ बनवून ‘ब्रेन वॉश’ करून ‘आपल्याकडे’ वळविण्याचे, टिकवण्याचे कामही सुरू असते. या गोष्टींना व्यक्ती लागलीच बळी पडते, कारण कट्टरता डोक्यात असलेली व्यक्ती सारासार विचार करण्याची क्षमता गमावून बसते. शहानिशा न करता चटकन एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवते. यामुळे द्वेष, कट्टरता अधिकाधिक टोकदार होत जाते. याशिवाय वापरकर्त्या व्यक्तीला जी विचारधारा आवडते तीच माहिती समाज माध्यमांद्वारे सतत त्या व्यक्तीच्या पुढ्यात ओतली जाते. त्यातून हे विचार हेच अंतिम सत्य अशी धारणा बनते. यामुळे भिन्न मतांविषयी असहिष्णुता वाढते.

विज्ञान, नवकल्पना वा कल्पकता या भिन्न मतांच्या संघर्षातूनच पुढे येतात. त्यामुळे विविध विचारांना स्वीकारण्याची सहिष्णुता वाढणे गरजेचे आहे. मतभेदांना शत्रुत्व न मानता त्यातून शिकण्याची वृत्ती विकसित करणे आवश्यक आहे. संशोधनासाठी लागणारी ‘वस्तुनिष्ठता’ विकसित करणे आवश्यक आहे. कल्पकता ही एखाद्या स्वच्छ काचेसारखी असते, पण त्यावर जर द्वेषाचे धुके साचले, तर पलीकडचे जग स्पष्ट दिसत नाही.

आपण तंत्रज्ञानाच्या युगात आहोत, जिथे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’सारखी क्षेत्रे झपाट्याने वाढत आहेत. अशा काळात जर आपली तरुण पिढी संकुचित वादात, विद्वेषात अडकून पडली, तर आपण केवळ दुसऱ्या देशांनी शोधलेल्या तंत्रज्ञानाचे ‘वापरकर्ते’ बनून राहू, ‘निर्माते’ कधीच होऊ शकणार नाही. म्हणूनच, द्वेष ही केवळ सामाजिक समस्या नाही; ती बौद्धिक प्रगतीचीही शत्रू आहे. ती मनाला बंद करते, विचारांना कुंठित करते आणि नवकल्पनांना गुदमरवते. जर आपल्याला उद्याची पिढी कल्पक, संशोधक आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करणारी घडवायची असेल, तर प्रेम, सहिष्णुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांना प्राधान्य द्यावे लागेल. कारण शेवटी, जिथे मन मोकळं असतं तिथेच कल्पना जन्म घेतात आणि जिथे द्वेष असतो, तिथे कल्पनांचा श्वास गुदमरतो.

(लेखक पेटंटधारक उद्योजक असून, बौद्धिक संपदा हक्काचे अभ्यासक आहेत.)