कालपरवापर्यंत पैसे देण्याघेण्यासाठी वापरले जाणारे ‘चेक्स’ ऊर्फ ‘धनादेश’ ऑनलाइन युगात खूपच कमी प्रमाणात वापरले जाऊ लागले आहेत. मौर्य साम्राज्याच्या काळात (इ.स. पूर्व ३२१ ते १८५) ‘आदेश’ नावाचे एक व्यावसायिक भूर्जपत्रावर लिहिलं जाणारं कागदी साधन वापरलं जात असे. जणू एका कोषागाराला (बँकेला) दुसऱ्या कोणाला पैसे देण्याचा तो आदेश व परवानगी असे. रोमन साम्राज्यात इ.स. पूर्व पहिल्या शतकात ‘प्रेस्क्रिप्शन’ नावाने चेकचा वापर केला गेला. तिसऱ्या शतकात पर्शियन राज्यातील कोषागारांनी क्रेडिटपत्रे म्हणजेच ‘कॅक’ अथवा कागदपत्रे किंवा करार वापरायला सुरुवात केली. इसवी सनाच्या पहिल्या शतकात पर्शिया आणि नजीकच्या सासनिड राज्यात कागदावर व्यवहाराच्या रकमेची नोंद करत. त्या कागदाला ‘शाह’ किंवा ‘सक्क’ म्हटलं जाई.
नवव्या शतकात बगदादमधील व्यावसायिक ‘कॅथी’ म्हणजेच चीनमध्ये ‘अक्क’ नावाचे चेक वठवत असत. सिल्करुटमुळे ते शक्य होई. अक्क पुढे सन १२२०पर्यंत इतका लोकप्रिय झाला की उत्तर-आफ्रिका, दक्षिण-फ्रांस, इटली, स्पेन अशी त्याची व्याप्ती वाढली. त्यानंतर अब्बासीद खलिफा तसेच अरब प्रदेशातील व्यापाऱ्यांनी कागदी ‘सक्क’ तयार केले. पैसे प्रत्यक्ष नेण्यापेक्षा कागदी सक्क ने-आण करायला सोपे होते. नवव्या शतकात आजच्यासारखं एका देशातील व्यापारी दुसऱ्या देशातील त्याच्या कोषागारातील सक्क ‘स्टॉप पेमेंट’ करून रोखू शकत होते. पर्शियन कवी फिरदौसी जगप्रसिद्ध ‘शाहनामेन’ नावाच्या पुस्तकात ससानिद राजवंशाचा उल्लेख करताना ‘चेक’ शब्द वापरतात.
दहाव्या शतकात इब्न हक्कक यांनी औदाघोस्तमध्ये लिहिलेल्या ४२ हजार दिनार किंमतीच्या चेक्सच्या वापराची चर्चा करतात. तेराव्या शतकात व्हेनिसमध्ये सोनं, चांदी, हिरे, मौल्यवान वस्तू वाहून नेण्यासाठी किंवा बार्टर ऐवजी ‘सेटलमेंट बील’ वापरत. त्याचा वापर पुढे संपूर्ण युरोपात सुरू झाला.
सन १५००च्या आसपास डच प्रजासत्ताकातील लोकांनी रोख रकमा कॅशियरकडे जमा करायला सुरवात केली. कॅशियर्स पैसे सांभाळण्यास शुल्क आकारत. वाढती स्पर्धा आणि कॅशियर्सना ताब्यात ठेवण्यास त्यांना वाढीव सेवा देण्याबाबत दबाव टाकण्यात आला. त्यानुसार ठेवीदाराकडून आलेल्या लेखी आदेशानुसार नमूद केलेल्या व्यक्तीला पैसे देण्याची सोय करण्यात आली. पैसे भरल्याचा पुरावा म्हणून नोट ठेवली जाई. लवकरच संपूर्ण इंग्लंड आणि युरोपात ही कल्पना वेगात पसरली.
नाईट टेम्पलर्सनी यात्रेकरूंना सुखनैव प्रवास करण्यास चेक पद्धती रुजवली. यात्रेकरू प्रवासात अत्यावश्यक जुजबी पैसे जवळ बाळगून बाकी पैशांचे तपशील लिहून पैसे धर्मगुरूकडे देत. सांकेतिक भाषेत पैशांचे तपशील लिहून धर्मगुरू कागद यात्रेकरूंकडे देत असत. इप्सितस्थळी पोहोचल्यावर यात्रेकरु त्या कागदाच्या साहाय्याने आपले पैसे परत मिळवत असे. बाराव्या शतकात कैरो गेझीना येथे चेक्स वापरत.
सतराव्या शतकांपर्यंत हे विनिमय बील अगदी घरगुती व्यवहारांतही वापरलं जाऊ लागलं आणि ‘चेक’ प्रकारात पुढे आलं. प्रारंभी त्याला ‘नोट्स’ म्हटलं जायचं. ते वापरून ग्राहक बँकेतून पैसे काढणे किंवा भरणे करू शकत होते. १६ फेब्रुवारी १६५९रोजी लंडन मधील लेखक आणि बँकर मेसर्स मॉरिस आणि कलेटन यांच्यावर काढलेला चेक आजही संग्रहालयात पाहायला मिळतो. विसाव्या शतकात चेक्सचा वापर सर्वाधिक झाला. नॉन-कॅश पद्धत म्हणून चेक लोकप्रिय झाले. भारतात दरवर्षी अब्जावधी चेकची देवाणघेवाण होते. १७१७मध्ये बँक ऑफ इंग्लंडने प्रथम प्री-प्रिंटेड फॉर्म्स चेक पेपरवर छापून घेतले. १७७०मध्ये लंडनमधील लोम्बार्ड स्ट्रीटवरील फाइव्ह बेल्स टॅव्हर्नमध्ये बँक लिपिक एकत्र येऊन सर्व धनादेश एकमेकांत बदलून, नोंदी करून घेत. तेच जगातलं पहिलं चेक क्लिअरिंग हाऊस ठरलं. १९३१मध्ये जिनेव्हा कन्व्हेन्शनमुळे आंतरराष्ट्रीय चेक्स आणि १९५९मध्ये मशीन रिडेबल कॅरेक्टर (MICR) प्रणाली अंमलात आली. आजच्या डिजिटल युगात जगभरात चेक्सचा वापर जवळपास ८०% घटला आहे तरीही चेक सर्वोत्तम हस्तांतरणीय साधन (Negotiable Instrument) असून नवीन प्रणालीमुळे चेक कमीतकमी वेळात क्लिअर होणं आता शक्य झालं आहे. ऑनलाईन पेमेंट्स जरी सर्वमान्य झाली असली तरीही मोठ्या रकमा आणि महत्वाची काही पेमेंटस देण्यासाठी आजही धनादेश हाच पर्याय उपलब्ध आहे.








