जांभोरा येथे देवदर्शनासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव बसने धडक दिल्याने पती ठार, तर पत्नी गंभीर जखमी झाली. चिखली-जालना महामार्गावर बेराळा फाट्याजवळ सोमवारी सकाळी ९ वाजता हा अपघात घडला.
चिखली तालुक्यातील केळवद येथील संजय पांडुरंग गायकवाड (५८) हे पत्नी शीला गायकवाड (५०) यांना सोबत घेऊन सकाळी जांभोरा येथे देवदर्शनासाठी निघाले होते. चिखलीच्या पुढे आल्यानंतर बेराळा फाट्यावर रस्ता ओलांडत असतानाच जालन्याकडून चिखलीच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या संभाजीनगर-हिंगणघाट या बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात संजय गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी शीला गायकवाड गंभीर जखमी झाल्या. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दुचाकीस्वार जागीच ठार
भंडारा : लाखनी तालुक्यातील जेवणाळा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. ही घटना पालांदूर–लाखनी राज्य मार्गावरील लुकेश उपरीकर यांच्या शेताजवळील वळण रस्त्यावर घडली. मृत दुचाकीस्वार हा लाखनीकडे दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली.








