अधिकृत टपरीवर कारवाई

महाराष्ट्र टाइम्स

An authorized stall owner in Yerawada protested after his stall was demolished. Municipal authorities took action against his legal stall instead of numerous illegal ones. The stall owner demands action against all illegal encroachments and corrupt officials. Political leaders have supported his protest. The incident highlights a perceived bias in municipal enforcement.

अधिकृत टपरीवर कारवाई
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

येरवडा जेल रस्त्यावर बदामी चौकात संपूर्ण पदपथावर अधिकृत आणि अनधिकृत खाद्यपदार्थांच्या टपऱ्या उभारल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथ सोडून रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे पालिकेकडून अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित असताना अतिक्रमण पथकाने वेळेवर कर भरणाऱ्या एका अधिकृत दुकानावर कारवाई करण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे दुकानचालक रूपेश गायकवाड याने महापालिकेविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले असून, परिसरातील पदपथांवरील सर्व अनधिकृत टपऱ्या आणि दुकानावरील कारवाईची मागणी लावून धरली आहे.

पूर्व उपनगरात पदपथांवर सर्वत्र अनधिकृत टपऱ्या आणि हातगाडीवाल्यांनी दुकाने मांडून अतिक्रमणे केली असताना पालिकेकडून कारवाईकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. येरवडा परिसरात पर्णकुटी चौक, गुंजन चौक, बदामी चौक, विश्रांतवाडी टँक रस्ता आणि विमानतळ रस्त्यावर असणाऱ्या पदपथांवर सर्रास भाजी, फळविक्रेते, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या लावून अतिक्रमणे केली आहेत.

एका लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने या ठिकाणी निम्म्याहून जास्त टपऱ्या अनधिकृत उभारल्या आहेत. याची माहिती असूनही राजकीय दबावामुळे अतिक्रमण पथकाकडून कारवाई केली जात नाही, असा आरोप अधिकृत टपरीचालक करीत आहे. बदामी चौकात रूपेश गायकवाड यांची परवानाधारक टपरी आहे. दोन दिवसांपूर्वी अतिक्रमणे पथकाने अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्याची अपेक्षा असताना गायकवाड यांची अधिकृत टपरी जेसीबी चालवून तोडून टाकली.

अतिक्रमणे सोडून अधिकृत टपरीवर कोणाच्या सांगण्यावरून कारवाई केली, हप्ते गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदारसंघाचे अध्यक्ष आनंद सरवदे, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, ‘आप’चे मनोज शेट्टी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.