राज्य सरकारच्या कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेची अमलबजावणी करताना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुष्ठरुग्ण शोधमोहिमेदरम्यान वर्षभरात ८६ रुग्ण शोधले आहेत. मागील वर्षी राबविलेल्या शोध मोहिमेत कल्याण, डोंबिवली शहरात १२४ रुग्ण आढळले होते.
कल्याणमध्ये कुष्ठवसाहत असून मागील वर्षीपासून रुग्णांची शासनाकडे नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबवलेल्या शोधमोहिमेत २४७ आरोग्य पथकांमार्फत ५५ आरोग्य पर्यवेक्षकांकरवी १ लाख ३ हजार ७४० घरांना भेटी देत ५ लाख १० हजार ५५४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत ३,३६० संशयित रुग्ण आढळले. यापैकी २९ कुष्ठरुग्ण सापडले. या रुग्णांवर विनाशुल्क औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. तर ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत वीटभट्टी, कैदी, बांधकाम आणि खाण कामगार, स्थलांतरीत व्यक्ती, निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी, वृद्धाश्रम, यासारख्या अतिजोखमीच्या भागांचे सर्वेक्षण करत ७,७५८ नागरिकांची तपासणी केली असता यात ८ रुग्ण सापडल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मागील वर्षभरात ७७ रुग्ण रोगमुक्त झाले आहेत.
कुष्ठरोगाची लक्षणे दिसूनही सामाजिक भीतीमुळे तपासणी करण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळेच या आजाराचे समूळ उच्चाटन करणे शक्य झालेले नाही. कुष्ठरोगाची लक्षणे दिसताच आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जाते. आता या आजारावर उच्च प्रतीची औषधे उपलब्ध असून यामुळे रुग्ण रोगमुक्त होऊ शकतो. यामुळेच रुग्णाचे प्रमाण आटोक्यात आणणे शक्य झाले आहे.






