रेल्वे स्थानकावर चिमणीला आग

महाराष्ट्र टाइम्स

A fire incident occurred at Pune Railway Station on Platform Number One. The blaze started in the chimney of Om Sai Ram Food Plaza. Firefighters were present and quickly brought the situation under control. This prevented a major disaster. Railway officials and security personnel arrived at the scene. The area was cleared for safety. The fire was extinguished within minutes.

रेल्वे स्थानकावर चिमणीला आग
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर असलेल्या ओम साईराम फूड प्लाझाच्या चिमणीमध्ये आगी लागल्याची घटना सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. पुणे रेल्वे स्थानकावर आधीपासूनच असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पुणे रेल्वे स्थानक फलाट क्रमांक एकवर ‘आयआरसीटीसी’मार्फत ओम साईराम फूड प्लाझाला परवानगी दिलेली आहे. या ठिकाणी खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. फलाट क्रमांक एकवरून सायंकाळच्या सुमारास अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्या सुटतात. त्यामुळे प्रचंड गर्दी असते. रात्री साडेसातच्या सुमारास ओम साईराम फूड प्लाझाच्या किचनमधून जाणाऱ्या चिमणीत आग लागली. त्या वेळी अगोदरच अग्निशमन दलाचे अधिकारी ब्रान्टो गाडी घेऊन कामानिमित्त उपस्थित होते. त्यांनी धाव घेऊन रेल्वेस्थानकावर असलेल्या उपकरणाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागल्यानंतर हॉटेलच्या चिमणीमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत होता. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या आगीची माहिती समजल्यानंतर रेल्वेचे अधिकारी, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फलाट क्रमांक एकवर आग लागलेला परिसर सुरक्षेच्या कारणास्तव काही वेळ रिकामा केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणली.

चौकशी होणार का?

पुणे रेल्वे स्थानकवरील फलाट क्रमांक एकवर खाद्यपदार्थाचे अनेक स्टॉल आहेत. मोठी आग लागल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. रेल्वेने फलाट क्रमांकावरील सर्व स्टॉल व दुकानांना फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या फूड मॉलचे फायर ऑडिट झाले नव्हते का आणि झाले असेल, तर ते व्यवस्थित केले नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.