‘कोणताही संघर्ष इतका भयंकर असू नये, की तो मानव म्हणून आपल्या सर्वांमध्ये असलेली एकमेव महाशक्ती, म्हणजेच क्षमा नष्ट करू शकेल. मला फक्त या संधीचा वापर करून मणिपूरमध्ये शांतता परत येण्यासाठी प्रार्थना करायची आहे. चित्रपटातील बालकलाकारांसह सर्व विस्थापित मुले पुन्हा एकदा त्यांचा आनंद मिळवू शकतील,’ अशा शब्दांत दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांनी ‘बाफ्टा’ या प्रतिष्ठित चित्रपट सोहळ्याच्या रंगमंचावर भावना व्यक्त केल्या.
रविवारी संध्याकाळी रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात ‘ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स पुरस्कार’ म्हणजेच ‘बाफ्टा’मध्ये मणिपुरी चित्रपट ‘ बूंग ’ला सर्वोत्कृष्ट ‘बाल आणि कौटुंबिक’ श्रेणीतील पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी रंगमंचावर येताच त्यांनी मणिपुरी भाषेत सर्वांना नमस्कार करून हिंसक वांशिक संघर्षांना तोंड देत असलेल्या मणिपूरच्या समस्येकडे लक्ष वेधले; तसेच राज्यात शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. मणिपूरमध्ये दोन वर्षांपासून हिंसाचार सुरू आहे. आतापर्यंत यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.
‘मी भारतातील एका अतिशय अशांत राज्यातून आले आहे, जिथे लोककथांनी जगण्यासाठी मदत केली. दूरवर गोळीबाराचे आवाज येत असतानाही त्यांच्यासोबत मला सुरक्षित वाटायचे,’ असेही त्या म्हणाल्या. लक्ष्मीप्रिया यांनी, आजीच्या लोककथांपासून प्रेरणा घेऊन हा चित्रपट दिग्दर्शित केल्याचे सांगितले.
फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित, ‘बूंग’ची कथा पित्याच्या शोधात असलेल्या लहान मुलाच्या भावविश्वाची आहे.
धर्मेंद्र यांना श्रद्धांजली
दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना ‘इन मेमोरियम’ विभागात श्रद्धांजली वाहण्यात आली. तर, अभिनेत्री आलिया भट हिने ‘सेंटिमेंटल व्हॅल्यू’ या इंग्रजीतर भाषिक सर्वोत्कृष्ट चित्रपटाला पुरस्कार प्रदान केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मणिपूरचे मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘बूंग’च्या निर्मात्यांचे अभिनंदन केले आहे. ‘या चित्रपटाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन. हा खरोखरच खूप आनंदाचा क्षण आहे, विशेषतः मणिपूरसाठी. हा आपल्या देशातील अफाट सर्जनशील प्रतिभेलाही अधोरेखित करतो,’ असे पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.






