भंडारा : चेन्नई येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या वरठी येथील मयुरी चौधरीचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. मयुरीचे पार्थिव सोमवारी चेन्नईवरून वरठीला आणण्यात आले. यानंतर रात्री नऊ वाजताच्या सुमारास स्थानिक मोक्षधाममध्ये तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चेन्नई येथे महाराष्ट्रातील काही तरुण एका आयटी कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी गेले आहेत. शनिवारी सुट्टी असल्याने हे सर्व गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेले होते. सेल्फी घेत असताना समुद्राच्या मोठ्या लाटेत मयुरीसह तिघे ओढले गेले. त्यातील मयुरीचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयुरीचे कुटुंबीय तातडीने चेन्नईकडे रवाना झाले होते. सोमवारी तिचे पार्थिव घेऊन वरठीला परतले.






