नागपूर : शहरातील आर्थिकदृष्ट्या दु्र्बल घटकातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत नागपूर महापालिकेच्यावतीने ५१८ नागरिकांना सदनिकांची विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मौजा नारा येथे ही योजना राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या पहिल्या टप्प्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर शहरातील सर्वच विधानसभा क्षेत्रात याप्रकारची एक योजना प्रस्तावित करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आज, मंगळवारपासून सुरू होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रपरिषदेत दिली. लाभार्थ्यांना ३१ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी करता येईल. यासंदर्भात सविस्तर माहिती https:// www.nmcnagpur.gov.in// या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.






