‘ एल मेंचो ’ हा मेक्सिकोतील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या गुन्हेगारी टोळीतील एकाचा प्रमुख होता. फेंटानिल, मेथॅम्फेटामाइन आणि कोकेन यांची अमेरिकेत तस्करी करणे तसेच, सरकारच्या अधिकाऱ्यांवर उघडपणे हल्ले करणे यासाठी त्याची टोळी कुप्रसिद्ध होती. एल मेंचो हा पश्चिमेकडील मिचोआकान राज्यातील रहिवासी होता. सन १९९४मध्ये अमेरिकेत हेरॉइन तस्करीच्या आरोपाखाली त्याच्यावर खटला चालला आणि त्याला तीन वर्षांची शिक्षा झाली. मेक्सिकोत परतल्यानंतर अमली पदार्थांच्या अंडरवर्ल्डमध्ये तो झपाट्याने पुढे गेला. सन २००९च्या सुमारास त्याने ‘जालिस्को न्यू जनरेशन कार्टल’ची स्थापना केली.
मेक्सिकोतील सर्वांत शक्तिशाली ‘जालिस्को न्यू जनरेशन कार्टल’ या ड्रग कार्टलचा (अमली पदार्थ तस्करांची टोळी) म्होरक्या नेमेसियो रुबेन ओसेगेरा सर्व्हांतेस उर्फ ‘एल मेंचो’ हा मेक्सिकोच्या लष्कराने केलेल्या कारवाईत रविवारी मारला गेला. मेंचोच्या मृत्यूमुळे मेक्सिकोतील सर्वांत सामर्थ्यशाली ‘ड्रग कार्टल’चे नेतृत्व संपुष्टात आले आहे; तसेच देशात ड्रग्ज तस्करांचा बीमोड सुरू असल्याचे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाला ‘दाखवण्यात’ मेक्सिको सरकारला मोठे यश आले आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, रविवारी जालिस्को राज्यातील तापाल्पा येथे मेंचोला पकडण्यासाठी कारवाई करण्यात आली. चकमकीत जखमी झालेल्या मेंचोला मेक्सिको शहरात विमानाने नेत असताना त्याचा मृत्यू झाला. जालिस्को हे फेंटानिलसह मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ अमेरिकेत तस्करी करणाऱ्या टोळीचे मुख्य ठाणे मानले जाते. ‘ही कारवाई मेक्सिकोच्या विशेष दलांनी द्विपक्षीय सहकार्याने तडीस नेली असून अमेरिकी अधिकाऱ्यांनी पूरक गुप्त माहिती पुरवली,’ असे मेक्सिकोतील अमेरिकी दूतावासाने ‘एक्स’वर जाहीर केले.
कारवाईनंतर जाळपोळ
५९ वर्षीय मेंचोच्या मृत्यूनंतर देशभर सशस्त्र गटांनी हिंसाचार केला. कार्टलच्या गुंडांनी जाळलेल्या गाड्यांमुळे जवळपास डझनभर राज्यांतील रस्ते बंद झाले आणि धुराचे लोट आकाशात पसरले. राजधानीचे शहर ग्वादालाहारा येथे लोकांनी स्वतःला घरात कोंडून घेतले. अनेक राज्यांमध्ये सोमवारी शाळा बंद ठेवण्यात आल्या आणि देशभर सुरक्षा दलांना सावध करण्यात आले. कारवाईदरम्यान सैन्यावर गोळीबार झाला. जालिस्कोतील पुएर्तो वलार्टा या पर्यटनस्थळावर धुराचे लोट दिसत होते. रविवारी दुपारी एअर कॅनडाने पुएर्तो वलार्टाकडे जाणारी उड्डाणे थांबवली.
अमेरिकेने त्याच्या अटकेसाठी दीड कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. अध्यक्ष ट्रम्प यांनी त्याच्यासाठी मेक्सिकोला कठोर कारवाईचा इशाराही दिला होता.






