महापालिकेत महापौर, उपमहापौरांपाठोपाठ आता स्थायी समिती अध्यक्षही बिनविरोध निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची स्थायीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे यांचा उमेदवारी अर्ज एक मिनिट उशिरा दाखल झाल्याने त्यांचा अर्ज बाद ठरवल्याने अध्यक्षपदाची माळ भिमालेंच्या गळ्यात पडली.
महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या स्थायी समितीच्या अध्यक्षाच्या हाती असतात. त्यामुळे हे पद महत्त्वाचे मानले जाते. या पदासाठी भिमाले आणि टिंगरे या दोघांचेच अर्ज आले होते. पालिकेवर एकहाती सत्ता असलेल्या भाजपचे स्थायी समितीत १२ सदस्य आहेत. त्यामुळे भिमाले यांची निवड औपचारिकताच होती.
या निवडणुकीसाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे आयुक्त सतीशकुमार झगडे यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नगरसचिव योगिता भोसले निकम यांनी उमेदवारी अर्ज छाननीसाठी झगडे यांच्याकडे दिले. भिमाले यांनी भरलेले चारही अर्ज वैध ठरले. टिंगरे यांनी अर्ज मुदत संपल्यानंतर एका मिनिटाने दाखल केल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समिती सदस्य असलेल्या माजी महापौर वैशाली बनकर, टिंगरे यांच्यासह काँग्रेसचे सदस्य माजी महापौर प्रशांत जगताप यांनी हा अर्ज अवैध ठरवू नये; विरोधकांना लढण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली. पीठासीन अधिकाऱ्यांचा निर्णय कायम राहील, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली. त्यानंतर झगडे यांनी भिमाले बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. यानंतर महापौर मंजूषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बीडकर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह सर्व स्थायी समिती अध्यक्षांनी भिमाले यांचे अभिनंदन केले.
स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य आहेत. यांपैकी अमोल बालवडकर निवडणुकीच्या वेळी अनुपस्थित राहिले. बालवडकर वगळता स्थायी समितीचे सर्व सदस्य निवडणुकीसाठी उपस्थित होते.






