राष्ट्रपती भवन ासह भारताचे पहिले संसद भवन व ल्युटियन्स दिल्लीचे निर्माते मानल्या जाणाऱ्या एडविन ल्युटियन्स यांचा पुतळा राष्ट्रपती भवन परिसरातून हटवण्यात आला आहे. त्याऐवजी त्याच चौथऱ्यावर स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले व अखेरचे भारतीय गव्हर्नर-जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात सुरू असलेल्या पहिल्या ‘राजाजी उत्सवामध्ये’ त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
‘अशोक मंडपाजवळील राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याने आता ल्युटियन्स यांच्या पुतळ्याची जागा घेतली आहे. वसाहतवादी मानसिकतेचे अवशेष नष्ट करण्यासाठी, भारताची समृद्ध संस्कृती, वारसा आणि परंपरा अभिमानाने स्वीकारण्यासाठी आणि भारतमातेच्या सेवेत अभूतपूर्व योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा हा एक भाग आहे,’ असे राष्ट्रपती मुर्मू यांनी याबाबबत ‘एक्स’वरील पोस्टमध्ये असे म्हटले आहे.
देशाच्या इतिहासाला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या प्रख्यात भारतीय नेत्यांना ओळखण्यासाठी व्यापक राष्ट्रीय प्रयत्नांचे प्रतीक असल्याचे मुर्मू यांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खतेमंत्री जगत प्रकाश नड्डा, परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, संस्कृती आणि पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन आणि राजाजींच्या कुटुंबातील काही सदस्य उपस्थित होते. राजाजी हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे व्याहीदेखील होते.






