(टाइम्स वृत्तसंस्था)
नवी दिल्ली, दि. २३ - युद्धविराम रेषेवरील तंग वातावरण कमी करण्याच्या दृष्टीने मुजाहिद, रझाकार व इतरांची जम्मू-काश्मीरमध्ये भरती करण्याचे, त्यांना शिक्षण व शस्त्रे देण्याचे थांबवावे, अशी सूचना भारताने पाकिस्तानला केली असल्याचे संरक्षणमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी आज लोकसभेत जाहीर केले.
भारत-पाकिस्तान सरहद्दीवरील परिस्थितीसंबंधी निवेदन करताना श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, या दोन देशांच्या लष्करप्रमुखांच्या नुकत्याच बैठकी झाल्या, त्यावेळी भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल चौधरी यांनी पाकिस्तान सेना प्रमुखांपुढे हा प्रस्ताव मांडला. संरक्षणमंत्री पुढे म्हणाले, एक गोष्ट स्पष्ट आहे की, दि. ९ व १० फेब्रुवारीस उभय सेनाप्रमुखांत झालेल्या करारानुसार जम्मू व काश्मीरमधील अनधिकृत लोकांची, रझाकारांची व मुजाहिदांची संख्या १९४९च्या कराची कराराच्या संदर्भात ठरवलेल्या मर्यादेतच ठेवावी लागेल.
(२४ फेब्रुवारी १९६६)






