भारतीय संघ व्यवस्थापन टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील ‘सुपर-८’ फेरीतील पुढील लढतीत सध्या फॉर्मात नसलेल्या तीन फलंदाजांपैकी किमान एकाला डच्चू देण्याची शक्यता आहे. तसे संकेत भारतीय क्रिकेट संघाचे सहायक प्रशिक्षक रायन टेन डोशेट आणि सितांशू कोटक यांनी दिले.
रविवारी टी-२० वर्ल्ड कपच्या ‘सुपर-८’ सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७६ धावांनी पराभव केला. आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला पुढील दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य असून, संघ व्यवस्थापनाला अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या कामगिरीचा आढावा घ्यावा लागणार आहे. ‘फिनिशर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिंकू सिंहची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. त्याने २९ चेंडूंत केवळ २४ धावा केल्या असून, त्याचा ८२.७५ चा स्ट्राईक रेट अत्यंत लाजिरवाणा आहे. फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक म्हणाले, ‘मुख्य प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाला काही तरी वेगळे करण्याची गरज वाटत असेल, तर आम्ही नक्कीच संघात बदल करू. अर्थात, परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल.’
संजू सॅमसनचे पुनरागमन?
सहायक प्रशिक्षक रायन टेन डोशेट म्हणाले, ‘संघात तज्ज्ञ फलंदाजांचा पर्याय उपलब्ध नसणे ही चिंतेची बाब आहे. खराब फॉर्ममध्ये असूनही संजू सॅमसनला संघात परत आणले जाऊ शकते. अव्वल फळीत केवळ डावखुरे फलंदाज असल्यामुळे निर्माण झालेला एकसुरीपणा मोडण्यासाठी उजव्या हाताच्या फलंदाजाला संधी दिली जाऊ शकते. गेल्या १८ महिन्यांपासून चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना साथ द्यायची की संजूला संघात स्थान द्यायचे, हा प्रश्नच आहे.’ संजूला एकाच लढतीत संधी मिळाली आहे.
‘अहंकार बाजूला ठेवा’
‘दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यातील पराभवातून भारताने धडा घ्यावा. यापुढील सामन्यांत अहंकार आणि अतिआत्मविश्वास बाजूला ठेवून मैदानात यावे. प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर धाडण्य़ाचा अट्टहास सोडून परिस्थितीनुसार खेळावे,’ असा सल्ला माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी दिला. गावसकर म्हणाले, ‘भारतीय फलंदाजांनी ब्रेविस आणि मिलर यांचासारखा दृष्टिकोन अवलंबण्याची गरज होती. प्रत्येक चेंडूवर फटकेबाजीच्या नादात सूर्या आणि त्याच्या सहकाऱ्यांनी विकेट गमावल्या. टी-२०मध्ये असे खेळायचे नसते. दक्षिण आफ्रिकेने सर्वच स्तरावर वरचढ कामगिरी केली.’ अक्षर पटेलला झिम्बाब्वेविरुद्ध संधी द्यावी, असेही ते म्हणाले.
‘अक्षरचा निर्णय धोरणात्मक’
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अक्षर पटेलला वगळण्याच्या निर्णयावर टीका होत आहे. हा निर्णय धोरणात्मक होता आणि त्याची अक्षरला कल्पना देण्यात आली असल्याचे डोशेट आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी सांगितले. डोशेट म्हणाले, ‘गेल्या दोन दिवसांपासून आम्ही अंतिम अकराबाबत खूप चर्चा केली. आता मागे वळून पाहताना अक्षरला खेळवणे योग्य ठरले असते, असे वाटत असले, तरी त्या वेळी आम्हाला आठव्या क्रमांकावर रिंकू सिंहच्या रूपाने अतिरिक्त फलंदाजाची गरज भासली होती.’
आता रनरेट महत्त्वाचा
भारतास उपांत्य फेरीसाठी दोन विजयही पुरेसे नाहीत. दोन लढती जिंकून भारताचे आता जास्तीत जास्त चार गुण होऊ शकतात. दक्षिण आफ्रिका संघ वेस्ट इंडिज किंवा झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत झाल्यास तीन संघांचे समान गुण होऊ शकतात. या परिस्थितीत निव्वळ धावगतीवर क्रमवारी ठरणार. अशा वेळी रनरेट महत्त्वाचा ठरणार. त्यामुळे पुढील दोन्ही लढती भारताला मोठ्या फरकाने जिंकाव्या लागणार आहेत.






