सभागृहातील नेतेमंडळींचे भाषण ऐकताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यांतून नकळतपणे सतत अश्रू ओघळत होते. अजित पवारांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे चित्र सभागृहात दिसले.
‘अजितदादा अंतःकरणापासून प्रेम करणारे माझे सच्चे मित्र होते. वक्तशीरपणा ही दादांची सर्वांत चांगली सवय. पण, दादांनी पहिल्यांदाच टायमिंग चुकवले. ते सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजितदादांच्या रूपात एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता,’ अशा भावोत्कट उद्गारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत अजित पवार यांना शोकप्रस्तावावर श्रद्धांजली वाहताना दोन्ही सभागृहांतील सदस्यांना गहिवरून आले.
शोकप्रस्तावावर बोलताना मंत्री छगन भुजबळ, मंत्री अदिती तटकरे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे भास्कर जाधव, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे रोहित पवार, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आशीष शेलार, सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम यांच्यासह अनेकांना अश्रू अनावर झाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘या वर्षी दादांनी १२वा अर्थसंकल्प मांडला असता. पुढच्या वर्षी १३वा मांडून बॅ. शेषराव वानखेडे यांच्या विक्रमाची बरोबरी केली असती. वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेचा भार पडेल असे म्हटले होते; पण दादांनी ती योजना मंत्रिमंडळासमोर आणली. एका सच्च्या मित्राचा असा मृत्यू होणे, ही अंत:करणाला वेदना देणारी गोष्ट आहे. ही पोकळी भरून काढणे केवळ अशक्य आहे.’
सुनेत्रावहिनींनी अजितदादांचे कार्य पुढे नेण्याचा निश्चय केला आहे. त्याही दादांसारखी प्रतिमा निर्माण करतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ‘आम्हाला २०१९मध्ये सरकार बनवायचे होते. दादांच्या वरिष्ठांनी तो निर्णय बदलवला. पण दादांनी भूमिका घेतली, मी शब्द दिला आहे तो मोडणार नाही. मग आम्ही शपथ घेतली. त्यांना त्याची किंमत मोजावी लागली,’ असेही फडणवीस म्हणाले.
अजित पवारांच्या आठवणी सांगताना रोहित पवार यांचा कंठ दाटून आला. आपल्या शर्टचे वरचे बटण उघडे असायचे. त्यावर ते बटण लावत जा, असे अजित पवार म्हणायचे. पण, चाळीस-पन्नास वर्षांनंतर कधी दादांची वर भेट होईल त्या वेळी आपण त्यांच्यासमोर हे बटण लावू. तोपर्यंत हे बटण तसेच उघडे राहील, त्यामुळे दादांची रोज आठवण येईल,’ अशा शब्दांत रोहित यांनी भावना व्यक्त केल्या.
उर्वरित मजकूर...८








