येथील सी. के. पी. सभागृहात शनिवारी रोजी सांगीतिक मुलाखतीचा सोहळा रंगला. पै फ्रेंड्स लायब्ररी आणि डॉ. श्रीकांत शिंदे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रख्यात गायक पं. वसंतराव आजगावकर आणि त्यांच्या तीन पिढ्यांचा सांगीतिक प्रवास रसिकांसमोर उलगडला.
यावेळी बा. सी. मर्ढेकर, विंदा करंदीकर आणि प्र. के. अत्रे यांच्या क्लिष्ट व विडंबनात्मक कवितांनाही श्रवणीय चाली लावल्या, याची आठवण वसंतराव यांनी सांगितली. ‘मर्ढेकरांच्या कविता गाता येतील असे कधीच वाटले नव्हते,’ अशी दाद खुद्द पु. ल. देशपांडे यांनी दिली होती, असे सांगितले.
वसंतराव यांचा वारसा त्यांचे पुत्र निनाद, कौस्तुभ आणि नात नीरजा समर्थपणे चालवत आहेत. निनाद आजगावकर यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देत संवादिनीवर काही सुरेल गीतांची झलक सादर केली. नीरजा यांनी माणिक वर्मा यांनी गायिलेल्या आणि वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचे सादरीकरण केले. तर कौस्तुभ आजगावकर यांनी गाणे आणि सुलेखन यातील साम्य अधोरेखित केले. कार्यक्रमाची सांगता निनाद आजगावकर यांनी ‘गीत रामायणातील’ भैरवी गाऊन केली. एका दिग्गज गायकाचा आणि त्यांच्या कुटुंबाचा हा सांगीतिक प्रवास रसिकांच्या प्रदीर्घ काळ स्मरणात राहील, असाच होता. विदुषी पंडिता शुभदा पावगी यांनी घेतलेल्या या मुलाखतीने श्रोते मंत्रमुग्ध झाले.






