नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात येथील एआय इम्पॅक्ट समिटमध्ये भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या ‘शर्टलेस’ आंदोलनप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ग्वाल्हेरमधून युवक काँग्रेसच्या आणखी तीन कार्यकर्त्यांना सोमवारी अटक केली. यामुळे या प्रकरणात आत्तापर्यंत अटक केलेल्या कार्यकर्त्यांची संख्या सात झाली आहे.
दोन गटांमध्ये तेढ वाढवणे आणि राष्ट्रीय एकात्मतेला हानीकारक विधाने करण्याचे आरोप या कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआरमध्ये जोडण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून जितेंद्र यादव, राज गुज्जर आणि अजयकुमार यांना ताब्यात घेतले. दरम्यान, ललितपूरमधून युवक काँग्रेसचे उत्तर प्रदेश महासचिव रितिक उर्फ मॉन्टी शुक्ला यांनाही ताब्यात घेतले असून, युकाँचे अध्यक्ष उदय भानू चिब यांची पोलिस चौकशी करीत आहेत.






