भारतीय संघ व्यवस्थापन टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील ‘सुपर-८’ फेरीतील पुढील लढतीत सध्या फॉर्मात नसलेल्या तीन फलंदाजांपैकी किमान एकाला डच्चू देण्याची शक्यता आहे. तसे संकेत भारतीय क्रिकेट संघाचे सहायक प्रशिक्षक रायन टेन डोशेट आणि सितांशू कोटक यांनी दिले.
रविवारी टी-२० वर्ल्ड कपच्या ‘सुपर-८’ सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७६ धावांनी पराभव केला. आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला पुढील दोन सामने जिंकणे अनिवार्य असून, संघ व्यवस्थापनाला अभिषेक शर्मा (४ सामन्यांत १५ धावा) आणि तिलक वर्मा (५ सामन्यांत १०७ धावा, ११८ चा स्ट्राईक रेट) यांच्या कामगिरीचा आढावा घ्यावा लागणार आहे. ‘फिनिशर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिंकू सिंहची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. त्याने २९ चेंडूंत केवळ २४ धावा केल्या असून, त्याचा ८२.७५ चा स्ट्राईक रेट अत्यंत लाजिरवाणा आहे. फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक म्हणाले, ‘मुख्य प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाला काही तरी वेगळे करण्याची गरज वाटत असेल, तर आम्ही नक्कीच संघात बदल करू.’
संजू सॅमसनचे पुनरागमन ?
सहायक प्रशिक्षक रायन टेन डोशेट म्हणाले, ‘संघात तज्ज्ञ फलंदाजांचा पर्याय उपलब्ध नसणे ही चिंतेची बाब आहे. खराब फॉर्ममध्ये असूनही संजू सॅमसनला संघात परत आणले जाऊ शकते. अव्वल फळीत केवळ डावखुरे फलंदाज असल्यामुळे निर्माण झालेला एकसुरीपणा मोडण्यासाठी उजव्या हाताच्या फलंदाजाला संधी दिली जाऊ शकते. एकीकडे कर्णधार सूर्यकुमार यादव आम्हाला फलंदाजांच्या फॉर्मची चिंता नसल्याचे सांगत असला, तरी अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्याबद्दल बोलताना डोशेट यांनी त्यांचा फॉर्म चिंतेचा विषय असल्याचे मान्य केले.






