विद्यार्थिनींनो, करिअरला आकार देतानाच न्यायहक्कांबाबत सजग रहा

महाराष्ट्र टाइम्स

बार्टीच्यावतीने आयोजित 'महिला हक्क जाणीव जागृती पर्वा'चा समारोप झाला. या कार्यक्रमात विद्यार्थिनींना त्यांच्या न्यायहक्कांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. करिअर घडवतानाच स्वतःच्या हक्कांबाबत सजग राहण्याचा सल्ला देण्यात आला. व्यसनाधीनता, प्रेमसंबंधातील फसवणूक आणि हुंडाबळी यांसारख्या धोक्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले.

विद्यार्थिनींनो, करिअरला आकार देतानाच न्यायहक्कांबाबत सजग रहा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

विद्यार्थिनींनी आपल्या करिअरला आकार देतानाच आपल्या न्यायहक्कांबाबत सजग व सुरक्षित राहिले पाहिजे. तसेच व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने जागरूक राहिले पाहिजे, असा सल्ला बार्टीचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके यांनी वसतिगृहांतील विद्यार्थीनींना ‘ महिला हक्क जाणीव जागृती पर्वा’चा समारोपप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या प्रादेशिक कार्यालयातर्फे सिव्हिल लाइन्समधील मुक्ताबाई शासकीय मुलींचे वसतिगृह व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सावित्रीबाई फुले जयंतीदिन ३ जानेवारीपासून सुरू असलेल्या ‘महिला हक्क जाणीव जागृती पर्वा’चा समारोप झाला. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना वाळके बोलत होते. संवैधानिक दृष्टिकोनातून महिला हक्क जाणीव जागृती पर्वाचे महत्त्वही त्यांनी यावेळी विशद केले. विचारपिठावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्या ॲड. सुरेखा बोरकुटे, वसतिगृहाच्या गृहपाल शुभांगी जीवने, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके तसेच बार्टीचे अधिकारी उपस्थित होते.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त बार्टीच्यावतीने ‘महिला हक्क जाणीव जागृती पर्वा’चे आयोजन करण्यात आले. या पर्वाचे हे तिसरे वर्ष असून विविध शासकीय वसतिगृहांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ तसेच युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले.

पर्वाच्या उद्घाटक ॲड. बोरकुटे यांनी विद्यार्थिनींना त्यांच्या न्यायहक्कांबाबत मार्गदर्शन केले. जातीचा दाखला, नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. व्यसनाधीनता व कुसंगत यामुळे गुन्हेगारीकडे वाटचाल होऊ शकते, याबाबत सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच प्रेमसंबंधातील फसवणूक, हुंडाबळी आणि लिव्ह-इन संबंधांतील धोके याविषयी विद्यार्थिनींमध्ये जाणीव जागृती केली. गृहपाल शुभांगी जीवने यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रास्ताविकात बार्टीच्या सुनीता झाडे यांनी, शहरातील बेसा, वसंतनगर, दाभा आणि राहाटेनगर येथील शासकीय वसतिगृहांमध्ये राबविण्यात आलेल्या ‘महिला हक्क जाणीव जागृती पर्वा’ची माहिती देत हे स्त्रीशक्तीचे पर्व असल्याचे त्यांनी नमूद केले.

बार्टीच्यावतीने सलमान शेख, खुशाल ढाक यांनी विविध योजनांची माहिती देत विद्यार्थिनींशी संवाद साधला. कार्यक्रमात सृष्टी खडसे या विद्यार्थिनीने स्फूर्तीगीत सादर केले. वसतिगृहातील इतर विद्यार्थिनींनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शीतल गडलिंग यांनी केले तर आभार नागेश वाहुरवाघ यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी विद्यार्थिनींची उपस्थिती होती.