अपक्ष उमेदवारांची मांदियाळी

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची मोठी संख्या आहे. पक्षाने तिकीट नाकारल्याने अनेक बंडखोर नेते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. यामुळे अधिकृत उमेदवारांची चिंता वाढली आहे. काही प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरू शकते. एकूण १७०० उमेदवार नशीब आजमावत आहेत, ज्यात पुरुष आणि महिलांचा समावेश आहे. अनेक प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे.

अपक्ष उमेदवारांची मांदियाळी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारल्याने नाराज होऊन निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरलेले बंडखोर तसेच इतर अपक्ष उमेदवार यांमुळे विविध पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना धडकी भरवली आहे.

आठ वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत ७००हून अधिक अपक्ष उमेदवार रिंगणात होते. यंदा हे प्रमाण ५०० असले तरी प्रमुख पक्षांतून बंडखोरी करून अनेकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अपक्ष उमेदवारांमुळे मतविभाजनाचा धोका आहे. मुंबईतील काही भागांत अपक्ष उमेदवारांची भूमिका आणि त्यांची मते निर्णायक ठरणार आहे. मुंबईत १७०० उमेदवार नशीब अजमावत असून त्यात ८२२ पुरूष तर ८७८ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

घाटकोपर पूर्वमधील प्रभाग क्रमांक १२५ मध्ये एकूण २१ उमेदवार असून त्यामध्ये ११ उमेदवार अपक्ष आहेत. या प्रभागात शिवसेनेचे सुरेश आवळे उभे असून शिवसेना उबाठाकडून सतीश पवार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून हरिश्चंद्र जंगम, आप, समाजवादी पार्टी आदी पक्षांचे उमेदवारही रिंगणात आहेत.

वरळीतील प्रभाग क्रमांक १९३ मधून उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना उबाठाचे शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी भरली आहे. या प्रभागातून शिवसेना उबाठाचे हेमांगी वरळीकर अधिकृत उमेदवार आहेत.

वडाळातून प्रभाग क्रमांक २०२ मधून शिवसेना उबाठाकडून श्रद्धा जाधव असून स्थानिक शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.

वडाळ्यातीलच प्रभाग क्रमांक १७७ मधून भाजपच्या कल्पेशा कोठारी निवडणूक लढवत असून नेहल शाह यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भांडुपमध्येही प्रभाग क्रमांक ११४ मध्ये मनसेच्या अनिषा माजगावकर यांनीही बंडखोरी करत शिवसेना उबाठाच्या राजुल पाटील यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे.

महाराष्ट्रनगर असलेल्या प्रभाग क्रमांक १४३ मध्ये दहा अपक्ष .

काही प्रभागांत सात ते आठ आणि काही प्रभागांत चार ते पाच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.