शहरातील मतदान केंद्रावर ‘ईव्हीएम’ नादुरुस्तीचा मोठा फटका घोरपडे पेठ-महात्मा फुले मंडई या प्रभागाला बसला. ‘मॉकपोल’ दरम्यान या प्रभागातील २३ मतदान केंद्रांवरील मशिन बदलावी लागली तर प्रत्यक्ष मतदान सुरू झाल्यानंतरही सात ठिकाणचे कंट्रोल युनिट बदलली गेली. संपूर्ण शहरात ‘मॉकपोल’ आणि मतदान सुरू असताना मिळून १६८ बॅलेट युनिट तर १०१ कंट्रोल युनिट बदलली गेली आहेत. हे प्रमाण सरासरीच्या तुलनेत कमी असले तरी मशिन बिघडल्यामुळे मतदानाला उशीर झाला आणि पर्यायाने घोरपडे पेठ-महात्मा फुले मंडई या प्रभागात रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्याचे चित्र दिसले.
महापालिका प्रशासनाकडून शहरात सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरूवात होण्यापूर्वी मतदान केंद्रावर ‘ईव्हीएम’चा ‘मॉकपोल’ घेण्यात आला. या ‘मॉकपोल’ मध्ये ७४ मतदान केंद्रांवरील ७५ कंट्रोल युनिट बदलावी लागली. तर, त्याचवेळी ६० प्रभागांतील ९२ बॅलेट युनिट बदलली गेली. निवडणूक विभागाकडून कर्मचाऱ्यांना मतमोजणीसाठी बुधवारी ‘ईव्हीएम’ ताब्यात दिल्यानंतर त्यांच्याकडून रात्री या मशिनचा ‘मॉकपोल’ घेण्यात येतो. या वेळी ही मशिन नादुरुस्त असल्याचे लक्षात आले नव्हते का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. अथवा, संबंधित अधिकाऱ्यांकडून आदल्या रात्री या मशिनचा ‘मॉकपोल’ घेण्यात आला नसल्यामुळे हा गोंधळ झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
‘घोरपडे पेठ’त गोंधळ
घोरपडे पेठ-महात्मा फुले मंडई या प्रभागात ‘मॉकपोल’ दरम्यान २३ ठिकाणचे मशिन नादुरुस्त असल्याचे लक्षात आले होते. तसेच, मतदान सुरू झाल्यानंतर सात ठिकाणचे बॅलेट युनिट तर तीन ठिकाणी कंट्रोल युनिट बदलण्यात आले. मशिन नादुरुस्त होण्याचे सर्वाधिक प्रमाण या प्रभागात होते. पुणे महापालिकेत ४०११ मतदान केंद्र होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मशिन नादुरुस्त होण्याचे प्रमाण हे सरासरी दहा टक्के इतके गृहीत धरून अतिरिक्त ‘ईव्हीएम’ राखून ठेवण्यात येतात. घोरपडे पेठ-महात्मा फुले मंडई या प्रभागात राखीव ‘ईव्हीएम’पेक्षा अधिक नादुरुस्त झाल्याने या ठिकाणच्या मतदानाला विलंब झाल्याची स्थानिकांची तक्रार होती. या प्रभागातील मतदानाची वेळ वाढवून मिळावी, ही स्थानिकांची मागणी मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आली.
मतदानादरम्यान येथे गोंधळ
धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या प्रभागांमध्ये १२ हून अधिक मतदान केद्रांवर १६ बॅलेट, कंट्रोल युनिट बदलण्यात आले. घोरपडे पेठ-महात्मा फुले मंडई प्रभागात गोंधळ झाला. नगर रस्ता, शिवाजीनगर, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील प्रभागांमध्येही ‘ईव्हीएम’ बदलण्यात आले.








