मतदारांचा समसमान कौल

Contributed byरोहन टिल्लू rohan.tillu@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात मतदारांनी महायुती आणि ठाकरे बंधूंना साधारण समान कौल दिला. अनेक प्रभागांमध्ये चुरशीच्या लढती झाल्या. काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांमुळे महायुतीचे गणित बिघडले. अखेर भाजप, शिवसेना उबाठा, मनसे आणि काँग्रेस या सर्वांनाच या निकालाने समाधान दिले. एकूणच, या मतदारसंघातून महायुती, ठाकरे बंधू आणि काँग्रेस या तिन्ही घटकांना यश मिळाले.

voter decision in north west lok sabha equal votes for mahayuti and thackeray brothers

मुंबई : जोगेश्वरी पूर्व-पश्चिम, अंधेरी पूर्व-पश्चिम, वर्सोवा, दिंडोशी, कुरार गाव, मरोळ, विलेपार्ले पूर्व आणि पश्चिम यांचा काही भाग, एवढ्या मोठ्या भागांचा समावेश असलेल्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील ४४ प्रभागांमध्ये यंदा महायुती आणि ठाकरे बंधू या दोन्ही पारड्यांत साधारण समसमान कौल दिल्याचे चित्र आहे. जोगेश्वरी पूर्व आणि पश्चिम भागांमधील मध्यमवर्ग व कनिष्ठ मध्यमवर्गासह दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये तर शिवसेना उबाठा आणि मनसेचे वर्चस्व असल्याचे चित्र आहे.

जोगेश्वरीमधील प्रभाग क्रमांक ७३मधून खासदार रवींद्र वायकर यांची कन्या ॲड. दीप्ती वायकर-पोतनीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे विशेष लक्ष होते. या प्रभागातून दीप्ती यांचा पराभव झाला. शिवसेना उबाठा पक्षाच्या लोना रावत यांनी त्यांचा पराभव केला. दीप्ती वायकर यांना १०,२९३ मते मिळाली, तर लोना रावत यांनी १३,४२४ मते मिळवत तब्बल ३२०० मतांनी वायकर यांना पराभूत केले.

या प्रभागाच्या बाजूलाच असलेल्या प्रभाग क्रमांक ७४मधील लढत चुरशीची झाली. या प्रभागातून भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज होत भाजपच्या प्रवीण मर्गज यांनी आपल्या पत्नी प्रिया मर्गज यांचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला. दुसऱ्या बाजूला ही जागा मनसेने लढवण्याचे ठरवत विद्या आर्या-कांगणे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना उबाठा पक्षाच्या मंदार मोरे यांनी आपली पत्नी श्रावणी यांची उमेदवारी अपक्ष म्हणून दाखल केली. या प्रभागात मर्गज यांनी २,४१५ तर मोरे यांनी ३,१८४ मते मिळवत प्रस्थापित उमेदवारांचा विजय मुश्किल केला होता. अखेर विद्या आर्या-कांगणे यांनी ८,०३६ मते मिळवत ७९५५ मते मिळवणाऱ्या उज्ज्वला मोडक यांचा जेमतेम ८१ मतांनी पराभव केला.

वर्सोवा भागाचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक ५९ मध्ये कोळी समाजाने कोळी उमेदवाराला एकगठ्ठा मते देण्याची घोषणा केल्याने येथे काँग्रेसचे जयेश संधे यांचे पारडे जड झाल्याचे मानले जात होते. पण शिवसेना उबाठा पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे, भाजपचे योगीराज दाभाडकर आणि संधे अशा तिहेरी लढतीत फणसे यांनी बाजी मारली.

प्रभाग क्रमांक ६१ मध्येही तिहेरी लढत झाली. विशेष म्हणजे या प्रभागात भाजपच्या बंडखोर उमेदवाराने अर्ज दाखल करून निवडणूक लढवल्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवार राजुल पटेल यांना बसला. या प्रभागातून काँग्रेसच्या दिव्या सिंह यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवत राजुल पटेल यांच्यासह शिवसेना उबाठाच्या सेजल सावंत यांचाही पराभव केला. दिव्या यांना ८८९० मते मिळाली, तर राजुल पटेल यांना ६,८८५ मतांवर समाधान मानावे लागले. भाजपच्या बंडखोर उमेदवार उर्मिला गुप्ता यांनी २,७३७ मते मिळवत या मतदारसंघातील महायुतीचे गणित बिघडवले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मुंबईत अत्यंत मर्यादित यश मिळाले असले, तरी उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभाग क्रमांक ४३ मधून त्यांचे अजित रावराणे निवडून आले. त्यांनी ११,७६० मते मिळवली, तर त्यांच्या विरोधातील विनोद मिश्रा या भाजपच्या उमेदवाराला ११,२६५ मते मिळाली. ही लढतही प्रचंड अटीतटीची झाली. या प्रभागातही काँग्रेसच्या उमेदवाराने १६३१ मते मिळवत दोन्ही उमेदवारांच्या पायाखालची जमीन सरकवली होती.

या मतदारसंघात दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित प्रभू यांनीही शिवसेना उबाठा पक्षाकडून अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासमोर भाजपच्या विप्लव अवसरे यांचे आव्हान होते. ही निवडणूक आमदार सुनील प्रभू यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची मानली जात होती. एका बाजूला खासदार वायकर यांच्या कन्येचा पराभव झाला असताना दुसऱ्या बाजूला प्रभू यांनी मात्र आपल्या पुत्रासाठी विजय खेचून आणला. अंकित प्रभू यांना ११,१९७ मते मिळाली, तर विप्लव यांना ९,०२२ मतांवर समाधान मानावे लागले.

प्रभाग क्रमांक ८१ मधील लढतही तारांकित लढत मानली जात होती. या प्रभागातून भाजपचे अंधेरी पूर्वचे आमदार मुरजी पटेल यांच्या पत्नी केशरबेन पटेल रिंगणात होत्या. त्यांच्यासमोर शिवसेना उबाठा पक्षाच्या मोहिनी धामणे आणि काँग्रेसच्या कविता सरोज होत्या. मात्र केशरबेन यांनी तब्बल साडेपाच हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने सहज विजय मिळवला. एकेकाळी काँग्रेसकडून पालिका सभागृहाचे विरोधी पक्षनेतेपद भूषवलेल्या देवेंद्र आंबेरकर यांना प्रभाग क्रमांक ६३ मधून शिवसेना उबाठा पक्षाच्या तिकिटावर पराभवाची चव चाखावी लागली. भाजपच्या रुपेश सावरकर यांनी ५०० मतांनी त्यांचा पराभव केला. रुपेश सावरकर यांना ९,१९३ तर आंबेरकर यांना ८,६५५ मते मिळाली. या प्रभागात काँग्रेसच्या ॲड. प्रियंका सानप यांनी ४,३८० मते मिळवली.

या संपूर्ण मतदारसंघात प्रामुख्याने शिवसेना उबाठा आणि भाजप या दोन पक्षांनी सर्वाधिक उमेदवार उभे केले होते. त्याशिवाय काँग्रेसनेही अनेक प्रभागांमध्ये आपले उमेदवार दिले होते. त्यामुळे अशा प्रभागांमध्ये तिहेरी लढत होती. रात्री उशिरापर्यंत या लोकसभा मतदारसंघातील ४५ पैकी ३९ प्रभागांचे निकाल हाती आले होते. या ३९ पैकी १६ प्रभागांमध्ये भाजपची सरशी झाली. १५ प्रभागांमध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे, तर दोन प्रभागांत मनसेचे उमेदवार निवडून आले. शिवसेनेला या प्रभागात अत्यंत मर्यादित म्हणजे दोन जागा मिळाल्या. काँग्रेसने दोन जागा जिंकल्या असल्या, तरी त्यांच्या अनुभवी नगरसेविका विन्नी डिसोझा यांचा पराभव झाला. एकूणात उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाने महायुती, ठाकरे बंधू आणि काँग्रेस या तिन्ही घटकांना समाधानी केले.