ठाण्यात मतटक्का घटला

महाराष्ट्र टाइम्स

ठाणे महापालिकेत यंदा मतटक्का घटला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत ५५.५९ टक्के मतदान झाले. मतदारांची नावे गायब असणे, अपुरी सुविधा आणि ईव्हीएम मशीन बंद पडणे या कारणांमुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. यामुळे मतटक्का कमी झाल्याची शक्यता आहे. एकूण १६ लाख ४९ हजार ८६९ मतदारांपैकी ९ लाख १७ हजार १२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

ठाण्यात मतटक्का घटला
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

ठाणे महापालिकेच्या गुरूवारी झालेल्या मतदानाची दिवशी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार. ठाण्यात सुमारे ९ लाख १७ हजार १२३ मतदारांनी मतांचा हक्क बजावल्याचे समोर आले. एकूण मतदारांच्या तुलनेत मतदारांची टक्केवारी सुमारे ५५.५९ टक्के इतकी होती. २०२७मध्ये शहरात ५८.०८ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्याचे समोर आले आहे.

ठाणे महापालिकेच्या एकूण ३३ प्रभागांमध्ये एकूण २०१३ मतदान केंद्रांवर गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या ३३ प्रभागांमध्ये ८ लाख ६३ जार ८७९ पुरूष, ७ लाख ८५ हजार ८३१ महिला आणि १५९ इतर असे एकूण १६ लाख ४९ हजार ८६९ मतदार होते. त्यापैकी ४ लाख ८३ हजार ६९८ पुरूष, ४ लाख ३३ हजार ३८५ महिला आणि ४० इतर असे एकूण ९ लाख १७ हजार १२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे अंतिम आकडेवारीतून समोर आले. २०१७मध्ये महापालिका क्षेत्रातील मतदारांची संख्या १२ लाख २८ हजार इतकी होती. त्यापैकी ७ लाख ४९ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला होता. आकडेवारीच्या दृष्टीने मागील निवडणुकीपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले असले तरी एकूण मतदारांच्या तुलनेत दीड टक्के कमी मतदान झाल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे मागील निवडणुकीमध्येही मतदान केंद्रावर मतदारांची नावे गायब झाल्याचे प्रकार समोर आले होते. यंदाही तसेच झाले. या कारणामुळेही मतदान कमी होत असल्याची शक्यता राजकीय पक्षांकडून व्यक्त होत आहे.

मतदान केंद्रातील अपुरी सुविधा, मतदारांना सहन करावी लागणारी गैरसोय, मतदान केंद्रातील बंद पडणाऱ्या ईव्हीएम मशीन या कारणांमुळे मतदारांना मतदानापासून वंचित व्हावे लागत असल्यानेही मतदानाचा टक्का घटल्याची शक्यता व्यक्त होत आहे.