अंबरनाथमध्ये रस्त्यांच्या नियोजनशून्य कामामुळे डोकेदुखी

महाराष्ट्र टाइम्स
अंबरनाथमध्ये रस्त्यांच्या नियोजनशून्य कामामुळे डोकेदुखी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
शहरात शेकडो कोटी रुपये खर्चून उभारलेले काँक्रीटचे रस्ते पावसाळ्यात नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. खड्डेमुक्त प्रवासाचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या विकासकामांमुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचून त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त होत आहे. पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे योग्य नियोजन न केल्याने पाण्यातूनच मार्ग काढत घरी परतावे लागत आहे.

गेल्या दहा वर्षांत एमएमआरडीए, नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांच्या निधीतून प्रमुख रस्ते तसेच राज्य महामार्गांचे काँक्रीटीकरण केले आहे. त्यामुळे शहर खड्डेमुक्त झाल्याचे सांगत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी समाधान व्यक्त केले. मात्र पावसात या रस्त्यांचे वेगळेच वास्तव समोर आले आहे.
कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले असले तरी पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभावी व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. याशिवाय रस्त्यालगतचे नाले अरुंद झाल्याने दरवर्षी महामार्गावरील अनेक भाग पाण्याखाली जातात. शहरातील बी-केबिन रोड, फॉरेस्ट नाका परिसर, नवा रेल्वे उड्डाणपूल हे परिसर, पाले परिसर तसेच ग्रीन सिटीकडे जाणारा मार्ग अशा अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना सध्या पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतो. यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याबरोबरच अपघातांचा धोकाही वाढला आहे.

नागरिकांच्या मते, रस्ते बांधताना पावसाच्या पाण्याचा निचरा, नैसर्गिक जलवाहिन्या आणि नाल्यांची क्षमता यांचा पुरेसा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांनंतरही मूलभूत समस्या कायम आहेत. या पार्श्वभूमीवर नियोजनशून्य काम करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि संबंधित यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.