३९ कोटींचे अमली पदार्थ नष्ट

महाराष्ट्र टाइम्स
thane police destroyed narcotics worth 39 crores
ठाणे पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले सुमारे ३९ कोटी रुपये किमतीचे ६०० किलो अमली पदार्थ नवी मुंबईतील वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये नष्ट केले.

हा साठा एकूण ११२ गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आला होता. त्यापैकी सर्वाधिक ६६ गुन्हे गांजा संदर्भातील आहेत. नष्ट केलेल्या अमली पदार्थांमध्ये ५६४ किलो गांजा, ८५५ ग्रॅम हायब्रीड गांजा, ६ किलो एमडी, २० किलो चरस, कफ सिरपच्या १,४६७ बाटल्या तसेच १०४ ग्रॅम ब्राऊन शुगरचा समावेश होता. ‘ नशामुक्त भारत अभियान ’चा भाग म्हणून हे अमली पदार्थ नष्ट करण्याचे आदेश पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले होते. त्यानुसार केंद्रीय मुद्देमाल नाश समितीचे अध्यक्ष व ठाण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. पंजाबराव उगले आणि गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या पथकाने हा साठा नष्ट केला.