केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे चैतन्याचे वातावरण आहे. आगामी पाच वर्षांत सहकार तळागाळात रुजण्यासाठी प्रयत्न केले जातील. सहकाराच्या माध्यमातून समृद्धीकडे वाटचाल होईल, असे निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सोमवारी दिली.
केंद्रीय सहकार मंत्रालयाला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सहकार आयुक्तालय आयोजित सहकार सप्ताहाच्या सांगता समारंभात दूरदृश्यप्रणालीद्वारे पाटील बोलत होते. महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, पर्यावरण अभ्यासक श्यामला देसाई, जनरल विजय पवार (नि.), महासंघाचे उपाध्यक्ष सुभाष कर्णिक, सचिव मनीषा कोष्टी आदी या वेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सहकार विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.पटवर्धन म्हणाले, ‘केंद्रीय सहकार मंत्रालयामुळे सहकारांतर्गत येणाऱ्या विविध विभागांत सुसूत्रता आल्यामुळे नागरिकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत. केंद्रीय सहकार मंत्रालयामुळे नियमांत लवचिकता आणली. गृहनिर्माणाशी संबंधित सभासद आणि समिती सदस्यांना अनेक अधिकार दिले आहेत. गृहनिर्माण संस्थांशी संबंधित सभासदांना लाभ मिळेल, अशी त्यांची रचना केली आहे.’
समीर रूपदे यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा कोष्टी यांनी आभार मानले.