‘बँकेत ४० वर्षे आणि त्यातील २५ वर्षे कोषागारात काम करून निवृत्त झाल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी भाषणासाठी जायचो, तेव्हा भाषणाचे सादरीकरण आयोजक मागून घ्यायचे. हे पुरेसे ठरत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पुस्तक लिहावे, असे वाटले,’ असे ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ जयंत काकतकर यांनी सांगितले.
‘देशातील बचत दर कमी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, हे खरे नाही. तो इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये वळाला आहे. भारतात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. सामान्य लोकांची एक ‘इन्व्हेस्टमेंट बास्केट’ असली पाहिजे आणि त्यात सरकारी कर्जरोखे हवेतच,’ असे मत रिझर्व्ह बँक आणि ‘नाबार्ड’चे संचालक सतीश मराठे यांनी गुरुवारी व्यक्त केले.सहकार भारतीचे मुखपत्र ‘सहकार सुगंध’ प्रकाशित झाले. ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ जयंत काकतकर लिखित ‘सरकारी कर्जरोखे- बँका, पतसंस्था आणि सर्वसामान्यांसाठी गुंतवणुकीचा एक उत्कृष्ट पर्याय’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मराठे बोलत होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार सीए भरत फाटक, ‘सकाळ मनी’चे संपादक मुकुंद लेले, लेखक काकतकर, ‘सहकार सुगंध’चे संपादक भालचंद्र कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
मराठे म्हणाले, ‘भारताचे दरडोई उत्पन्न हे अडीच पटीने वाढले असून, २५ कोटी नागरिक दारिद्र्यरेषेवर आले. १५ कोटी नवे स्वयंरोजगार देणारे तयार झाले. समाजात प्रगती करणारा आणि त्यासाठी प्रयत्न करणारा सुशिक्षित वर्ग वाढतोय. यासाठी आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे. त्या कडीतील हे पुस्तक आहे.’
‘सामान्य गुंतवणूकदाराने कर्जरोख्यात यावे, असे सरकारचे मत आहे. कर्जरोख्यांची माहिती मिळविण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. ज्ञानाला व्यावसायिक स्वरूप देण्यास काकतकर यशस्वी ठरले,’ असे अनास्कर यांनी सांगितले.
‘सर्व गुंतवणुकीचा पाया सरकारी रोखे हा आहे. गुंतवणुकीचे मूल्यमापन सरकारी कर्जरोख्यांवर केले जाते. त्यामुळे हे पुस्तक कोषागार आणि सामान्यांसाठीही उपयुक्त ठरेल,’ असे फाटक यांनी सांगितले.
‘राज्यात १९ हजार पतसंस्था असून, त्यांच्याकडे एक लाख ९८ हजार कोटींच्या ठेवी आहेत. पतसंस्थांचे दोन कोटी ९८ लाख ठेवीदार आहेत. मात्र, केवळ पाच टक्के पैसा सरकारी कर्जरोख्यांत गुंतविला गेला आहे. या पुस्तकामुळे पतसंस्था चळवळीला गुंतवणुकीचा नवा दृष्टिकोन मिळेल,’ असे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.