पालखीतील अश्वांचीगणरायाला मानवंदना

महाराष्ट्र टाइम्स
honoring the esteemed horses of the palanquin with worship of lord ganesha
आषाढी वारीसाठी पंढरपूरला प्रस्थान करण्यापूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात श्री गणरायाच्या चरणी मानवंदना अर्पण केली. ‘माउली माउली’च्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथून श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे (सरकार) यांच्या मालकीचे हे मानाचे अश्व पुण्यात दाखल झाले आहेत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे अश्वांचे पूजन करण्यात आले. श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे (सरकार), श्रीमंत महादजी राजे शितोळे (सरकार), ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे उपस्थित होते.
‘श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात अश्वांना लाभलेले स्थान हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि सेवाभावाची बाब आहे. दरवर्षी आषाढी वारीपूर्वी श्री गणरायाचे दर्शन घेऊन हे अश्व आळंदीकडे प्रस्थान करतात,’ अशी भावना ऊर्जितसिंह शितोळे यांनी व्यक्त केली.

‘आषाढी वारीदरम्यान आरोग्य तपासणी, मोफत वैद्यकीय सल्ला, मोफत औषध वितरण, भोजन सेवा, चरण सेवा, अवयव दान जनजागृती; तसेच इतर सेवाभावी उपक्रमांद्वारे वारकऱ्यांची सेवा केली जाणार असून, या सर्व उपक्रमांची सुरुवात मानाच्या अश्वांच्या आगमनाने करण्यात आली आहे,’ असे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे यांनी सांगितले.