पुणे : ‘महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना नोंदणी व नियमन अधिनियम २०२५’ ( क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट ) हा कायदा वैद्यकीय संघटनांशी चर्चा न करता मंजूर केल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) दिला आहे. सरकारच्या विविध आरोग्य योजनांवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेण्यात येईल, असे ‘आयएमए’ने स्पष्ट केले.
या कायद्यातील काही तरतुदींमुळे लहान व मध्यम रुग्णालये, नर्सिंग होम, डे-केअर सेंटर्स, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आणि रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा लागू करण्यापूर्वी ‘आयएमए’सह सर्व संबंधित वैद्यकीय संघटनांशी चर्चा करावी.परिषद, प्राधिकरण व अपील समित्यांमध्ये कार्यरत डॉक्टर, लहान-मध्यम रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि वैद्यकीय संघटनांना स्थान द्यावे. सरकारी व खासगी आरोग्य संस्थांसाठी समान निकष लागू करावेत. रुग्ण सुरक्षा, पारदर्शकता व दर्जा यांसाठी सर्व संस्थांवर समान नियम असावेत. अवास्तव तपासण्या व प्रशासकीय हस्तक्षेपामुळे लहान रुग्णालयांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकतेे, असे ‘आयएमए’ने निवेदनात म्हटले आहे.