चिमुकल्याचा खून करणाऱ्यास जन्मठेप

महाराष्ट्र टाइम्स
चिमुकल्याचा खून करणाऱ्यास जन्मठेप
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
तक्रारदार आणि आरोपी शेजारी होते. घटनेच्या दिवशी मद्याच्या नशेत असलेल्या आरोपीने तक्रारदारांच्या मुलाला घरी नेण्याची मागणी केली. त्याला तक्रारदारांनी नकार दिला. मात्र, एका अल्पवयीन मुलीने चिमुकल्याला आरोपीच्या घरी नेले. काही वेळाने तक्रारदार मोठ्या मुलासमवेत चिमुकल्याला शोधत आरोपीच्या घरी गेले असता, त्याने चिमुकला तेथे नसल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदारांच्या नातेवाइकांनी आरोपीच्या घरात तपासणी केली असता, आरोपीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्याला बाजूला करून रहिवाशांनी टाकीचे झाकण उघडले असता पाण्यात चिमुकल्याचा टी-शर्ट तरंगताना दिसला. नातेवाइकाने तत्काळ टाकीतून चिमुकल्याला बाहेर काढले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता, असे तक्रारीत नमूद आहे.

मद्यधुंद अवस्थेत चार वर्षांच्या चिमुकल्याचा नाक व तोंड दाबून निर्घृण खून केल्यावर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकणाऱ्या नराधमाला खेड- राजगुरुनगर अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
चिमुकल्याचा मृत्यू अपघाती असल्याचा बनाव आरोपीने रचला; परंतु चिमुकल्याच्या ओठांवर मृत्यूपूर्व जखमा आढळल्या. त्यामुळे गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची साक्ष शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी नोंदवली. त्या आधारे सरकार पक्षाने सिद्ध केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला शिक्षा सुनावली.

‘चिमुकल्याला आरोपीची मुलगी तिच्या घरी घेऊन गेल्यापासून ते आरोपीच्या घराच्या टाकीतून त्याचा मृतदेह सापडेपर्यंतच्या घटनेशी संबंधित परिस्थितीजन्य पुराव्यांच्या साखळी सरकार पक्षाने सिद्ध केली आहे. आरोपीने गंभीर गुन्हा केला असून, चार वर्षांच्या निष्पाप मुलाचा जीव गेला आहे. या घटनेमुळे मुलाच्या पालकांना तीव्र मानसिक आघात सहन करावा लागला. ते या धक्क्यातून अद्याप सावरू शकलेले नाहीत,’ असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी निकालात नोंदविले आहे.

सचिन दत्तात्रय पिंगळे (वय ३७, रा. आंबेडकर वस्ती, चाकण) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात मृत मुलाच्या आईने तक्रार दिली होती. ही घटना पाच एप्रिल २०१६ रोजी चाकणमधील आंबेडकर वस्ती परिसरात घडली होती. चाकण पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील एस. एस. वाघ यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यात मृत मुलाची आई, भाऊ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

‘ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी घटना असून, गंभीर गुन्ह्यांमध्ये अवाजवी सहानुभूती दाखविल्यास न्यायव्यवस्था आणि कायद्यावरील जनतेचा विश्वास डळमळीत होईल,’ असे नमूद करून न्यायालयाने आरोपीला जन्मठेप सुनावली.

चिमुकल्याचा खून करणाऱ्यास जन्मठेप