Aashadhi Wari Moulis And Tukobas Palakhi Begin Today
माउलींच्या पालखीचेआज प्रस्थान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पिंपरी : आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज, बुधवारी (आठ जुलै) श्री क्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. परंपरेनुसार माउलींची पालखी संजीवन समाधी मंदिरातून प्रस्थान ठेवणार आहे. यानिमित्त मुख्य मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. मुख्य सोहळा दुपारनंतर प्रारंभ होईल. पावसामुळे इंद्रायणीला पूर आला असून, चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मर्यादित दिंडेकरी, वारकरी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रस्थान कार्यक्रम आयोजित केला आहे. इतर भाविकांनी आळंदीत प्रवेश करू नये, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले. दरम्यान, आळंदीत मुख्य पूल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे प्रस्थान मार्गात बदल करण्याचा निर्णय मंगळवारी (सात जुलै) रात्री उशिरापर्यंत घेण्यात आला नाही. पूर्वीच्याच मार्गाचा पर्याय खुला आहे, असे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे स्पष्ट करण्यात आले.
तुकोबांची पालखीआज उद्योगनगरीत
पिंपरी : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज, बुधवारी दुपारी चारच्या सुमारास पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व तयारी आणि नियोजनाची पाहणी केली आहे. आज, आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असेल. गुरुवारी (नऊ जुलै) पालखी पहाटे पाच वाजता पुण्याकडे मार्गस्थ होईल.