पवनकुमारच्या बहिणींसह त्याच्या बिकानेरमधील प्रेयसीची पोलिसांनी चौकशी केली. संपर्क झाल्यास माहिती देण्यास सांगितले होते. पवनकुमारने तिला संदेश पाठवताच तिने स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्या धाग्यावरून हनुमानगढ येथे पवनकुमारला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून सूत्रधार रविकुमारलाही बेड्या ठोकण्यात आल्या.
शहरातील एका व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करून, दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार करणाऱ्या बिश्नोई गँगच्या तिघांना अटक करण्यात आली. एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या पाच राज्यांत पाच हजार किलोमीटरचा पाठलाग, हजार तासांहून अधिक सीसीटीव्ही फूटेजची तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींपर्यंत पोलिस पोहोचले. आरोपींकडून तीन पिस्तुले जप्त करण्यात आली असून, सर्वांवर ‘ मकोका ’अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.शहरात २२ जूनला सायंकाळी साडेचारच्या सुमारास व्यावसायिकाला खंडणीचा पहिला कॉल आला. त्याने फोन कट केल्यानंतर आरोपींनी त्याच्या भावालाही धमक्या दिल्या आणि त्याच दिवशी फुरसुंगी परिसरात गोळीबार केला. घटनेनंतर परिमंडळ सहा आणि गुन्हे शाखेच्या चार पथकांनी तपास सुरू केला. पुणे, नाशिक, सुरत, जयपूर, हनुमानगढ, श्रीगंगानगर, भटिंडा आदी ठिकाणी तपासाचे जाळे पसरविण्यात आले. तपासात हरियाणातील रविकुमार हा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. आळंदीतील स्टील कंपनीत काम करणाऱ्या रविकुमारने मालकाची दुचाकी चोरून तिचा चॅसिस क्रमांक घासला, नंबर प्लेट बदलली आणि त्याच वाहनाचा वापर गोळीबार करताना केला होता. सत्यप्रकाशने व्यावसायिकाची माहिती रविकुमारपर्यंत पोहोचवल्याचे तपासात उघड झाले.
गोळीबारानंतर आरोपी दुचाकी, रिक्षा, कॅब आणि बसने नाशिक, सुरतमार्गे राजस्थान व हरियाणात पळाले. सीसीटीव्ही, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्यांचा माग काढला. बिकानेरमधील पवनकुमारच्या प्रेयसीला विश्वासात घेण्यात आले. तिला पाठविलेल्या संदेशाच्या आधारे हनुमानगढ येथून पवनकुमारला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीगंगानगर परिसरातून सूत्रधार रविकुमारला अटक करून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले. या कारवाईत गुन्हे शाखेची चार आणि परिमंडळ सहाचे एक पथक सहभागी होते. उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रत्येक पथकाला एक लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. दुचाकीवरून पोलिसांना रविकुमारचा सुगावा लागला होता.