Demand For Action Against The Institution Head In The Case Of Suicide In Fursungi
संस्थाचालकावर कारवाईची मागणी
महाराष्ट्र टाइम्स•
‘माझ्या भावाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या संस्थाचालकाला पंधरा दिवस उलटूनही अद्याप अटक का केली नाही,’ असा प्रश्न मृताच्या बहिणीने केला आहे. या प्रकरणी कारवाईसाठी मृत तरुणाच्या मित्रांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.
फुरसुंगी गंगानगर येथील खुल्या निवारागृहात कार्यरत समाजसेवक अतुल अंकुश लाळगे याने संस्थाचालकाकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी १५ दिवसांपूर्वी फुरसुंगी पोलिस ठाण्यात संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी मृत अतुल लाळगे यांची बहीण नीलम लाळगे, अतुल यांचे समाजसेवक मित्र यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यामध्ये धाव घेतली. शिवसेनेचे नगरसेवक नितीन गावडे, नगर परिषदेच्या नगरसेविका प्राची देशमुख यांनीदेखील आरोपीला अटक करण्याची मागणी केली.अतुल लाळगे अडीच वर्षांपासून श्री साई सेवाभावी संस्था संचलित खुल्या निवारागृहात समाजसेवक म्हणून कार्यरत होते. ‘पोलिस आरोपीच्या पत्त्यावर लातूर येथे जाऊनही आले, मात्र तो सापडला नाही. याबाबत आरोपीला शिक्षा होण्यासाठी पुरावे गोळा केले जात आहेत. पोलिस लवकरच आरोपीला अटक करतील,’ असे फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे म्हणाले.