Deterioration Of Palakhi Route And Solutions To Problems
पालखी मार्गाची दुरवस्था गंभीर
महाराष्ट्र टाइम्स•
‘सासवड रोड पालखी मार्गावर मंतरवाडी चौक रस्त्यावर खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले असून, रस्ता असमतोल झाला आहे. यामुळे पालखी रथासह लाखो वारकऱ्यांना हा रस्ता त्रासदायक ठरू शकतो. ही बाब गंभीर असून, याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची सूचना देणार आहे,’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
खासदार सुळे यांनी मंगळवारी दुपारी पालखी मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली. शनिवारी (११ जुलै) जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी हडपसर मार्गे सोलापूर रस्त्याने पंढरपूरकडे जाणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड मार्गे पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. फुरसुंगी रेल्वे उड्डाणपूल उतरल्यानंतर मंतरवाडी चौक ते उरळी देवाची येथील पेट्रोल पंपापर्यंतच्या पालखी मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर चिखल पसरला आहे. पालखीच्या दृष्टीने हे गंभीर आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या ठेकेदाराकडून खडी टाकून, रस्ता करण्यात येत आहे. मात्र, पाऊस सुरू असल्याने चिखल होत आहे.
पालखी येण्यापूर्वी रस्त्यावर पूर्ण रोलिंग करीत आहोत, असे ठेकेदाराच्या प्रतिनिधीने सांगितले आहे. या वेळी पोलिस निरीक्षक अमोल मोरे, फुरसुंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, नगराध्यक्ष संतोष सरोदे, प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.
‘पालखी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. सासवड रोडवरील वाहतुकीचे योग्य नियोजन केले, तर येथील रस्त्याचे काम जलदगतीने होऊ शकते,’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.