Inquiry On Katraj Dairy Unveils Fake Milk And Financial Misconducts
‘कात्रज’ डेअरीची सखोल चौकशी होणार
महाराष्ट्र टाइम्स•
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( कात्रज डेअरी ) संदर्भातील तक्रारींची सखोल चौकशी करून, दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यात येईल. चौकशीत बोगस दूध संस्था, आर्थिक गैरव्यवहार किंवा अन्य अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.
आमदार योगेश टिळेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. चर्चेत आमदार सदाभाऊ खोत, बच्चू कडू आणि अरुण लाड यांनीही सहभाग घेतला. मंत्री सावे यांनी सांगितले, की ‘कात्रज डेअरीसंदर्भात दोन जून २०२६ रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर दहा जूनला विभागीय उपनिबंधक यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ११ जून रोजी सहायक निबंधक आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांची द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचाही समितीत समावेश केला जाईल.’