Major Changes In Traffic For Palakhi Festival Restrictions On Key Routes
पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठे बदल
महाराष्ट्र टाइम्स•
कात्रज, वारजे, सिंहगड रस्ता, कोथरूड, शिवाजीनगर, खडकी, गोखलेनगर, येरवडा, हडपसर आणि वानवडी परिसरातून येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मुक्काम परिसरात कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही; त्यामुळे नागरिकांनी ठरवून दिलेल्या पार्किंगचा वापर करावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे नऊ जुलैला शहरात आगमन होणार असून, या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील; तसेच मुक्कामस्थळांजवळील अनेक प्रमुख रस्ते टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरात सर्व मार्गांनी येणाऱ्या जड वाहनांना बंदी असणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.दोन्ही पालखी सोहळ्यांमध्ये लाखो वारकरी सहभागी होणार असल्याने शहरातील वाहतूक सुरक्षित, सुरळीत आणि नियोजनबद्ध राहावी, यासाठी नऊ ते ११ जुलैदरम्यान विशेष वाहतूक आराखडा लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता पालखी मार्गावरील वाहतुकीवर निर्बंध असतील.
प्रमुख रस्ते बंद
नऊ जुलैला पहाटेपासून रात्रीपर्यंत बोपखेल फाटा-विश्रांतवाडी, आळंदी रस्ता, पाटील इस्टेट, वाकडेवाडी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्याल, गोखले रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, गणेशखिंड रस्ता, बेलबाग चौक, बुधवार चौक, नाना पेठ, भवानी पेठ; तसेच पालखी मार्गावरील विविध रस्ते वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने बंद राहतील.
मुक्कामस्थळी निर्बंध
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात असेल. त्यामुळे या भागात नऊ जुलैच्या दुपारपासून ११ जुलैपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी राहील. शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि काही प्रमुख रस्त्यांवर निर्बंध असतील.