बारामती : बारामतीमध्ये जिल्हा न्यायालयाच्या शेजारी नऊ मजली, १२ कोर्ट हॉलची सुविधा असलेले नवे ‘न्यायतीर्थ’ संकुल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ७२ कोटी १६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
बारामतीमधील न्यायालयांमध्ये वाढती प्रकरणे, अपुरी जागा आणि मर्यादित पायाभूत सुविधा यामुळे न्यायालयीन कामकाजावर ताण येत आहे. नवीन इमारतीमुळे हा ताण कमी होण्याबरोबरच न्यायदानाची प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ आणि नागरिकभिमुख होणार आहे. नवी न्याय संकुल इमारत आधुनिक वास्तुशास्त्राचा विचार करून उभारली जाणार आहे. तळमजल्यासह नऊ मजल्यांच्या या संकुलात १२ प्रशस्त न्यायालयीन दालने, न्यायाधीशांसाठी स्वतंत्र कक्ष, न्यायालयीन कर्मचारी कार्यालय, सरकारी वकिलांसाठी कार्यालय, बार असोसिएशनसाठी स्वतंत्र जागा आणि प्रशासकीय विभागाची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक कोर्ट हॉलमध्ये ध्वनिरोधक व्यवस्था, नैसर्गिक प्रकाश, वातानुकूलन आणि डिजिटल सुनावणीसाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने ‘मटा’ला माहिती दिली.इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रेकॉर्ड रूम, बार रूम, न्यायाधीशांसाठी ग्रंथालय, कर्मचारी कक्ष, बँक, सर्व्हर रूम, अभिलेखागार असणार आहे. दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यात कनिष्ठ स्तर न्यायाधीशांची न्यायालये, साक्षीदार कक्ष, रेकॉर्ड रूम, प्रतीक्षालय असेल. चौथ्या-पाचव्या मजल्यावर वरिष्ठ स्तर न्यायाधीशांची न्यायालये, पोस्ट ऑफिस, ई-सेवा केंद्र, सरकारी वकील कार्यालय असेल. सहाव्या-सातव्या मजल्यावर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांची न्यायालये, साक्षीदार केंद्र, नेटवर्क व विद्युत कक्ष, विश्रांती कक्ष असेल. आठव्या मजल्यावर ४९० आसनक्षमतेचे सभागृह, कॉन्फरन्स रूम, ग्रीन रूम, भोजन कक्ष असेल. याशिवाय नवव्या मजल्यावर सभागृह, अतिथी कक्ष (गेस्ट हाऊस), स्टोअर व विद्युत कक्ष उभारले जाणार आहे.