स्वरसंध्या कार्यक्रमाचे१३ जुलैला आयोजन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
organizing swara sandhya program in memory of nilu phule
पुणे : राष्ट्र सेवा दल, निळू फुले कला अकादमी आणि एकपात्री कलाकार परिषदेतर्फे दिवंगत ज्येष्ठ कलाकार निळू फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘ स्वरसंध्या ’ या आशा भोसले यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जुलैला दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी स्मारक येथील बॅ. नाथ पै सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी गायिका चैत्राली अभ्यंकर गाणी सादर करतील. कार्यक्रमाची संकल्पना भाग्यश्री देशपांडे यांची आहे. या वेळी ज्येष्ठ कलाकार श्रीराम रानडे यांना ‘निळू फुले स्मृती पुरस्कार’ प्रदान केले जाणार आहे. निळू फुले यांच्या भगिनी प्रमिला ठाकूर, सुभाष फुले यांच्या हस्ते दिला जाईल, असे परिषदेच्या सचिव पल्लवी परब भालेकर यांनी सांगितले.

बंजारा समाजाचा
मेळावा उत्साहात

पुणे : माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची ११३वी जयंती आणि बंजारा समाजाचा मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मूर्ती राठोड आणि बंजारा समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महापौर मंजूषा नागपुरे, नगरसेवक सुभाष नाणेकर, सोपान चव्हाण, अनिता इंगळे, धनश्री कोल्हे या वेळी उपस्थित होते. महापौर नागपुरे, राठोड यांच्या हस्ते नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

‘पेन्शनधारकांबाबत

केंद्र संवेदनशील’

पुणे : ‘ईपीएस-९५ पेन्शन योजनेतील पेन्शनधारकांबाबत केंद्र सरकार संवेदनशील आहे. संबंधितांना लवकर न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करीत आहोत, असे खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती आयोजित पेन्शनधारकांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. पेन्शनधारकांच्या विविध समस्या या वेळी मांडण्यात आल्या. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत, महाराष्ट्र संघटक अजितकुमार घाडगे यांच्यासह ईपीएस-९५ पेन्शन योजनेतील पेन्शनधारक उपस्थित होते.