पालखी सोहळ्यावरएआय, ड्रोनद्वारे लक्ष

Contributed byपोलिस आयुक्त|महाराष्ट्र टाइम्स
पालखी सोहळ्यावरएआय, ड्रोनद्वारे लक्ष
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), चेहरा ओळखणारी यंत्रणा (फेस रेकग्निशन), ड्रोन, जीपीएस ट्रॅकिंग, ॲडव्हान्स व्हिडिओ ॲनालिटिक्स आणि अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने यंदाचा आषाढी वारी पालखी सोहळा सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. शहरात पालखी सोहळ्यासाठी सात हजारहून अधिक पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात राहणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन गुरुवारी (नऊ जुलै) शहरात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपायांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी अमितेशकुमार म्हणाले, ‘पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाशी सर्व कॅमेरे जोडण्यात आले असून, संशयित व्यक्ती, संशयास्पद हालचाली, गर्दीची घनता, महिलांच्या सुरक्षेशी संबंधित घटना आणि वाहतुकीची स्थिती यावर एआय प्रणालीद्वारे सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. संशयित व्यक्ती कॅमेऱ्यात दिसताच नियंत्रण कक्षाला तत्काळ इशारा मिळणार असून, गर्दी धोकादायक पातळीवर पोहोचल्यास स्वयंचलित ॲलर्टही दिला जाणार आहे.’

महिला सुरक्षेसाठी पथके

महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र उपाययोजना करण्यात आल्या आहेत. साखळीचोरी, मोबाइलचोरी, पाकीटमारी आणि महिलांची छेडछाड रोखण्यासाठी गुन्हे शाखेची साध्या वेशातील विशेष पथके पालखी मार्गावर गस्त घालतील. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा करण्यात येणार असून, कोणतीही अनुचित घटना घडल्यास जलद प्रतिसाद पथके कारवाई करतील.