Significant Progress In Land Acquisition For Purandar Airport
पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा मार्ग मोकळा
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या भूसंपादनासाठी सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यास परवानगी देणारे महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंगळवारी एकमताने मंजूर झाले. या निर्णयामुळे आतापर्यंत केवळ ७५ कोटी रुपयांची असलेली कर्जमर्यादा थेट सहा हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ‘पुरंदर विमानतळाची जबाबदारी महामंडळांकडे सोपविण्यात आली असून, त्यासाठी ‘हुडको’कडून सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार आहे,’ असे मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.
पुरंदर विमानतळासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी ‘हुडको’मार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुरंदरमधील भूसंपादन प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेऊन, स्थानिक शेतकऱ्यांऐवजी इतर धनिकांच्या जमिनींचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचा आरोप केला. ‘एमआयडीसी’च्या भूसंपादनात कार्यरत असलेली एक टोळी या प्रक्रियेत सक्रिय असल्याचा दावाही केला. भूसंपादनाची माहिती अधिकाऱ्यांकडून ठरावीक लोकांना मिळत असते. त्या व्यक्ती तेथे जमिनी खरेदी करतात आणि त्यानंतर ‘एमआयडीसी’कडून जमीन संपादित केली जाते. असाच प्रकार पुरंदरमध्ये झाला असून ‘पवार’, ‘शिंदे’ यांच्या जमिनींची मालकी आता ‘अग्रवाल’, ‘लोढा’ यांच्या नावावर असल्याचे दिसत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.
‘कर्ज घेण्याची क्षमता वाढवताना संबंधित संस्थेने निकष पूर्ण केले आहे का? या मंडळाची हा प्रकल्प पूर्ण करण्याची आर्थिक क्षमता आहे का? याचा खुलासा करावा,’ अशी मागणी आमदार अनिल परब यांनी केली. दरम्यान, ‘दानवे यांनी केलेल्या आरोपांची खातरजमा करून त्यांना सविस्तर माहिती देण्यात येईल,’ असे देसाई म्हणाले.