स्वातंत्र्यवीर सावरकर ांनी राजकारणात सहभाग घेऊ नये, अशी अट ब्रिटिशांनी घातली होती. त्यामुळे त्यांचे बंधू गणेश दामोदर सावरकर यांनी महात्मा गांधींची भेट घेऊन भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची फाशी रद्द करण्याविषयी विनंती केली होती, असा दावा सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात केला. याबाबतची कागदपत्रे दाखल केली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी ब्रिटिशांशी तडजोड केली असती, तर ब्रिटिशांनी त्यांना १९४६मध्येच भारताचे पंतप्रधान म्हणून नेमले असते,’ असा दावा त्यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी मंगळवारी पुण्याच्या विशेष न्यायालयात उलटतपासणी दरम्यान केला. ‘ब्रिटिशांच्या नियमानुसारच सावरकरांनी रत्नागिरी वास्तव्यादरम्यान निर्वाह भत्त्यासाठी अर्ज केला होता. अशाच प्रकारे महात्मा गांधी , सरदार वल्लभभाई पटेल, शरदचंद्र बोस यांनाही निर्वाह भत्ता सुरू होता,’ असेही सात्यकी सावरकरांनी सांगितले.लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मार्च २०२३मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयासमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बदनामीकारक विधान केल्याचा आरोप करून, सात्यकी सावरकर यांनी पुण्याच्या विशेष न्यायालयात खटला दाखल केला आहे. लोकप्रतिनिधींविरोधात खटल्यांची सुनावणी घेणाऱ्या न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्यासमोर या दाव्याची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी घेतली. सात्यकी सावरकरांच्या वतीने ॲड. संग्राम कोल्हटकर बाजू मांडत आहेत.
‘सावरकरांच्या सुटकेसाठी महात्मा गांधींनी ‘यंग इंडिया’मध्ये लेख लिहिले होते; तसेच काकीनाडा येथील १९२३च्या काँग्रेसच्या अधिवेशनात ठरावदेखील करण्यात आला होता. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना पन्नास वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली होती. एवढी वर्षे तुरुंगात राहणे मान्य नसल्याने सावरकरांनी सुटकेसाठी याचिका केल्या होत्या,’ असे सात्यकी सावरकरांनी न्यायालयात सांगितले. १४ जुलैला पुढील सुनावणी आहे.