‘क्वीन्स गार्डन’ भागात घरांच्या आवारात पाणी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
water issues arise in queens garden area local residents angry response
पुणे : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी पुणे कँटोन्मेंट भागातील क्वीन्स गार्डन , डिफेन्स ऑडिट कॉलनी, इन्कम टॅक्स कॉलनी, जनरल अरुणकुमार वैद्य कॉलनीतील घरांच्या आवारात पाणी शिरले होते. संरक्षण मालमत्ता विभागाच्या महासंचालकांच्या घराचे आवार, शासकीय विश्रामगृह क्रमांक दोनच्या (आयबी) आवारातही पाणी साचले होते.

रेल्वेच्या नियोजित प्रकल्पामुळे नाल्यात अतिक्रमण झाल्याने पावसाचे पाणी घरांमध्ये शिरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला; तर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी वाहिनी छोटी पडत असल्याने घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाल्याचे उत्तर कँटोन्मेंट प्रशासनाने दिले.
‘सोळा क्वीन्स गार्डन येथे रेल्वेच्या एका प्रकल्पाचे काम सुरू असून, त्यासाठी या परिसरातील नैसर्गिक नाला बुजविला गेला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी या परिसरातील घरे व वस्त्यांमध्ये शिरले होते,’ असा आरोप स्थानिक रहिवासी राहुल शिंदे यांनी केला. दरम्यान, कँटोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांच्यासह प्रशासनाने क्वीन्स गार्डन परिसराची पाहणी केली. उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.